अर्जांचा पाऊस, २१० जागांसाठी ५३७ विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन !
By गेापाल लाजुरकर | Updated: June 29, 2024 17:08 IST2024-06-29T17:06:43+5:302024-06-29T17:08:22+5:30
चार शाखांसाठी प्रवेश प्रक्रिया : मुदतवाढीमुळे नाेंदणी संख्या वाढणार

Applications of 537 students for 210 seats!
गडचिराेली : गत आठ वर्षांपासून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा तंत्रशिक्षणाकडे ओढा वाढलेला आहे. जिल्हा मुख्यालयात असलेल्या एकमेव शासकीय तंत्रनिकेतनमध्ये उपलब्ध असलेल्या एकूण २१० जागांसाठी सध्या ५३७ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन केले आहे. त्यामुळे किती विद्यार्थ्यांना संधी मिळेल याची उत्सुकता लागलेली आहे.जिल्ह्यात तंत्रशिक्षण पदविका अभ्यासक्रमासाठी एकमेव शासकीय तंत्रनिकेत आहे. येथे खासगी तंत्रनिकेतन नाही. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील विद्यार्थी जिल्हा मुख्यालयातील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश घेण्यासाठी येतात.
आठ वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांचा तंत्रशिक्षणाकडील ओढा कमी झाला हाेता; परंतु शासकीय तंत्रनिकेतनने गेल्या पाच वर्षांपासून ‘स्कूल कनेक्ट’ प्राेग्राम शाळांमध्ये राबवून विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. तसेच अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी प्लेसमेंट उपलब्ध हाेत असल्याने शासकीय तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश घेण्याकडे ओढा वाढत आहे. पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता २९ मेपासून ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली हाेती. अर्ज भरणे, कागदपत्रांची पडताळणी, अर्ज निश्चिती प्रक्रियेसाठी २५ जूनपर्यंत मुदत हाेती. सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, काॅम्प्युटर आदी चार ब्रॅंचेससाठी विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे.
ऑनलाइन अर्जासाठी ९ जुलैपर्यंत मुदतवाढ
अभियांत्रिकी पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अर्ज सादर करण्यासाठी तंत्रशिक्षण संचालनालय (डीटीई)कडून मुदतवाढ देण्यात आली आहे. आता विद्यार्थ्यांना ९ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत.
असे आहे सुधारित वेळापत्रक
- ऑनलाईन अर्ज मुदत : ९ जुलै
- कागदपत्र पडताळणी व अर्ज निश्चिती : ९ जुलै- तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्धी : ११ जुलै
- गुणवत्ता यादीवरील आक्षेप कालावधी : १२ ते १४ जुलै
- अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्धी : १६ जुलै
अंतिम यादीनंतर निश्चित हाेणार प्रवेश
कागदपत्रे पडताळणी, अर्ज निश्चितीची प्रक्रिया यादरम्यान पूर्ण करता येणार आहे. ‘कॅप’साठी पर्याय अर्ज भरणे, कॅप जागा वाटप, जागा स्वीकृती करणे, उमेदवारांचे वाटप केलेल्या संस्थेमध्ये उपस्थित राहणे, प्रवेशाची अंतिम तारीख याबाबतचा तपशील अंतिम गुणवत्ता यादीनंतर जाहीर केला जाणार आहे.
शासकीय तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश घेणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना हमखास प्लेसमेंट मिळून राेजगाराची संधी उपलब्ध हाेते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश घ्यावा. नुकतेच अंतिम वर्षाच्या १३१ विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांमध्ये राेजगार उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
- डाॅ. अतुल बाेराडे, प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन