पावसाची विश्रांती, मात्र अनेक मार्ग बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2019 06:00 AM2019-09-08T06:00:00+5:302019-09-08T06:00:31+5:30

शुक्रवारी रात्रीपासून पावसाने उसंत घेतल्याने काही मार्ग खुले झाले. मात्र वैनगंगा नदीला लागून असलेल्या उपनद्यांना दाब निर्माण झाल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली. शनिवारी रात्री उशीरापर्यंत पूर कायम होता. शनिवारी दुपारी गाढवी नदी पुलावरील पाणी कमी झाला. मात्र पाल नदी पुलावरून पाणी असल्याने आरमोरी-नागपूर मार्गावरची वाहतूक ठप्प होती.

Rain rest, however, is closed to many routes | पावसाची विश्रांती, मात्र अनेक मार्ग बंदच

पावसाची विश्रांती, मात्र अनेक मार्ग बंदच

Next
ठळक मुद्देशेकडो घरांची पडझड । गोसेखुर्दच्या पाण्याने वैनगंगा फुगली; उपनद्यांना दाब

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : तब्बल तीन दिवसानंतर पावसाने शनिवारी उसंत घेतली. मात्र वैनगंगा नदीत गोसेखुर्द, मध्यप्रदेशातील संजय सरोवराचे पाणी सोडले जात असल्याने उपनद्यांना पूर आला आहे. भामरागड शहराला पाण्याने वेढले आहे. मागील दोन दिवसांपासून भामरागड शहर व तालुका संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहे.
गडचिरोली : बुधवार, गुरूवार व शुक्रवार हे तीन दिवस पावसाचे होते. या तीन दिवसात प्रत्येक तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. निम्म्याहून अधिक ठिकाणी अतिवृष्टी झाली. शुक्रवारी दुपारपर्यंत पाऊस कोसळत होता. त्यामुळे नदी, नाल्यांना पूर आला होता. शुक्रवारी रात्रीपासून पावसाने उसंत घेतल्याने काही मार्ग खुले झाले. मात्र वैनगंगा नदीला लागून असलेल्या उपनद्यांना दाब निर्माण झाल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली. शनिवारी रात्री उशीरापर्यंत पूर कायम होता. शनिवारी दुपारी गाढवी नदी पुलावरील पाणी कमी झाला. मात्र पाल नदी पुलावरून पाणी असल्याने आरमोरी-नागपूर मार्गावरची वाहतूक ठप्प होती. चामोर्शी मार्गावर शिवणी नाल्यावर पाणी असल्याने सदर मार्ग सुध्दा बंद होता. ग्रामीण भागातील इतरही मार्ग बंद होते. नागपूरला जाणे अतिशय गरजेचे असलेल्या प्रवाशांसाठी गडचिरोली डेपोतून पाथरी, सिंदेवाही, नागभिड मार्गे चार फेऱ्या सोडण्यात आल्या.
झिंगानूर : सिरोंचा तालुक्यातील झिंगानूरकडे जाणाºया कोरेतोगू नाल्यावर पाणी असल्याने या भागातील ३० गावांचा संपर्क तुटला होता. कोरेतोगू नाला झिंगानूरपासून १२ किमी अंतरावर आहे. या नाल्याच्या रपट्यावरून जवळपास चार फूट पाणी वाहत होते.
मार्र्कंडादेव : चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडादेव गावाच्या चारही मार्गावर पुराने वेढा घातल्याने या गावाचा संपर्क तुटला होता. मार्र्कंडादेव गाव अगदी वैनगंगा नदीच्या काठावर वसले आहे. वैनगंगा नदी ओसंडून वाहत असल्याने गावकऱ्यांमध्ये काही प्रमाणात भितीचे वातावरण निर्माण झाले होते.
आष्टी : वैनगंगेच्या पाण्याची पातळी वाढल्याने आष्टी जवळील पुलावरून वाहत होते. शुक्रवारी रात्री १० वाजता पुलावरून पाणी चढले. सदर पुलावरून दिवसभर चार फूट पाणी होते. त्यामुळे हा मार्ग बंद पडला होता.
मुलचेरा : दिना नदीला पूर आल्याने कोपरअल्ली मार्गावर असलेल्या पुलावर पाणी चढले. त्यामुळे मुलचेरा-आष्टी मार्ग बंद झाला. सदर मार्ग बंद होण्याची यावर्षीची तिसरी वेळ आहे.
वैरागड : वैरागड, मानापूर, ठाणेगाव, कुरंडी येथील अनेक घरांची पडझड झाली. हिरापूर, मेंढा, डोंगरतमाशी येथे पुराचे पाणी शिरल्याने धान पिकाचे नुकसान झाले.
आरमोरी : आरमोरी तालुक्यातील अनेक गावांना पुराचा फटका बसला. १५० पेक्षा अधिक घरांची पडझड झाली. शनिवारी दुपारी गाढवी नदीवरील पूर ओसरला. कुरंडी माल येथे घर कोसळल्याने जयपाल मडकाम जखमी झाला.
कुरखेडा : कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा येथील वन वसाहतीत टिपागड नदीचे पाणी शिरले. त्यामुळे अनेकांचे नुकसान झाले. पुलावरून चार फूट पाणी होते. कुरखेडाचे तहसीलदार रवींद्र चव्हाण, मालेवाडा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांनी भेट दिली. खबरदारीचा उपाय म्हणून मरेगाव वार्डातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले.
कमलापूर : कमलापूर परिसरातील रायगट्टा नाल्याला पूर आला. पुलावरून पाणी चढल्याने राजाराम परिसरातील जवळपास १२ गावांचा संपर्क तुटला. आलापल्ली-सिरोंचा मार्गावरील झिमेला नाल्याला पूर आल्याने रहदारी ठप्प झाली. राजाराम, गोलाकर्जी, रेपनपल्ली, कमलापूर याही गावांचा दुसºयांदा संपर्क तुटला. पूर परिस्थितीमुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत.

हे मार्ग आहेत बंद
गडचिरोली-आरमोरी, गडचिरोली, चामोर्शी, कोरची-बोटेकसा, कुरखेडा-वैरागड, मानापूर-पिसेवडधा, वडसा-नैनपूर, कारवाफा-पुस्टोला, मूल-चामोर्शी, तळोधी-आमगाव, मुलचेरा-घोट, आष्टी-गोंडपिपरी, आष्टी-चामोर्शी, आलापल्ली-भामरागड, आलापल्ली-सिरोंचा, आष्टी-मुलचेरा आदी मार्गांवरील वाहतूक शनिवारी रात्री उशीरापर्यंत ठप्प होती.

१६ बकऱ्या पुरात वाहून गेल्या
गुड्डीगुडम परिसरात आलेल्या पुरांमुळे गुड्डीगुडम येथील विलास मडावी, सन्याशी आत्राम, सुरेश आत्राम, चंदू कोडापे, रमेश कोरेत, चंदू आत्राम, सुधाकर मडावी, संदीप कोरतेट, मल्लुबाई पोरतेट या नऊ पशुपालकांच्या सुमारे १६ बकऱ्या वाहून गेल्या. यामुळे जवळपास ८६ हजार रुपयांचे नुकसान झाले.

पूर परिस्थितीचा पालकमंत्र्यांकडून वेळोवेळी आढावा
मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. पूर परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, यासाठी प्रशासनाने दक्ष राहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी यांना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहे. तसेच मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा वेळोवेळी आढावा घेत आहेत. पालकमंत्री स्वत: लक्ष घालून असल्याने जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा व इतर विभागांची यंत्रणा कामाला लागली असल्याचे मागील दोन दिवसांमधील कार्यांवरून दिसून आले. ज्या गावांना पुराच्या पाण्याने वेढा घातला होता, अशा गावी तहसीलदार, ठाणेदार व बचाव पथकाचे कर्मचारी पोहोचून नागरिकांना सुरक्षित स्थळी काढले आहेत.

पुराच्या पाण्यामुळे शेकडो घरे पडली आहेत. तसेच हजारो हेक्टर शेतजमिनीत पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा पंचनामा करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला पालकमंत्र्यांनी दिले आहेत. तसेच नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यानी प्रयत्न करावेत, असेही निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. अनेकांचे घर कोसळल्याने त्यांच्या समोर निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. घरातील साहित्य भिजून निकामी झाले आहेत. अशा कुटुंबांना सामाजिक संस्थांनी मदत करावी, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे. मिळालेली मदत पुरग्रस्तांना पाठविली जाणार आहे.

Web Title: Rain rest, however, is closed to many routes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.