दक्षिणेत पावसाचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:31 AM2021-07-25T04:31:02+5:302021-07-25T04:31:02+5:30
वैनगंगा नदीवरी गाेसेखुर्द धरणाच्या ३३ गेटपैकी १९ गेट अर्धा मीटरने उचलण्यात आले आहेत. धरणातून २ हजार २५० क्युमेक्स पाण्याचा ...
वैनगंगा नदीवरी गाेसेखुर्द धरणाच्या ३३ गेटपैकी १९ गेट अर्धा मीटरने उचलण्यात आले आहेत. धरणातून २ हजार २५० क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीकाठावरील गावांतील नागरिकांनी उचित सतर्कता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे. चिचडाेह बॅरेजचे सर्वच ३८ गेट उचलण्यात आले आहेत. पवनी, देसाईगंज, वाघोली व आष्टी सरिता मापन केंद्रावरील नोंदीनुसार वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी इशारा पातळीच्या खाली आहे. महागाव व टेकरा सरिता मापन केंद्रावरील नोंदीनुसार प्राणहिता नदी इशारा पातळीच्या खाली आहे. मेडीगड्डा बॅरेजचे ८५ पैकी ७९ गेट उघडलेले असून, २६ हजार ३२० क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीकाठावरील गावातील नागरिकांनी उचित सतर्कता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे. भामरागड सरिता मापन केंद्रावरील नोंदीनुसार पाणीपातळी पर्लकाेटा पुलाच्या २.२० मीटरने खाली आहे.
बाॅक्स
सिराेंचा तालुक्याला पुराचा तडाखा
सिराेंचा : राज्यभरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने सिराेंचा तालुक्यातून वाहणाऱ्या गाेदावरी व प्राणहिता या दाेन्ही नद्यांना पूर आला आहे. पुराचे पाणी सखल भागात असलेल्या शेतीत शिरल्याने साेयाबीन, कापूस, मिरची व धान पिकाचे माेठे नुकसान झाले आहे, तसेच जिल्ह्यातील इतर नद्यांची पाणीपातळी वाढली आहे.
सिराेंचा तालुक्यातील रेगुंठा, बामणी, रंगय्यापल्ली, अमरावती, कार्सपल्ली, सिरोंचा, नगरम, चिंतालपल्ली, आरडा, जानमपल्ली ही गावे प्राणहिता नदीच्या काठावर वसली आहेत. प्राणहिता नदीचे पाणी सखल भागात असलेल्या शेतांमध्ये शिरले आहे. त्यामुळे पीक नष्ट हाेण्याचा धाेका निर्माण झाला आहे.
अंकिसा : येथून ८ की.मी. अंतरावर असलेले सोमनपल्ली नाल्याच्या पुलावरून मागील चार दिवसांपासून पाणी वाहत आहे. त्यामुळे पातागुडम, कोपेला, कोरला व रायगुडम इत्यादी गावांचा संपर्क तुटला आहे. जीवनावश्यक वस्तूंसाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागते आहे. साेमनपल्ली नाल्यामुळे पावसाळ्यात पलीकडच्या गावांचा अनेक वेळा संपर्क तुटत असल्याने उंच पूल बांधण्याची मागणी हाेत आहे. मेडीगड्डा बॅरेजचे दरवाजे उघडल्याने गाेदावरी नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. माेटला टेकडा येथील शेतकऱ्यांच्या शेतात पुराचे पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
बाॅक्स
झाड काेसळल्याने वाहतूक ठप्प
चामाेर्शी तालुक्यातील भेंडाळा- सगणपूर मार्गावर डॉ. मंडल यांच्या शेताजवळील झाड पावसामुळे कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली हाेती. नागरिकांनी झाडाच्या फांद्या ताेडून रस्ता माेकळा केला.