पावसाने बोड्या फुटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 12:27 AM2018-08-22T00:27:53+5:302018-08-22T00:28:16+5:30

सोमवारी रात्री व मंगळवारी पावसाने उसंत घेतल्यानंतर नदी, नाल्यांचे पाणी कमी झाले आहे. पुलावरून पाणी ओसरल्याने भामरागड वगळता सर्वच मार्ग सुरू झाले आहेत. तर काही ठिकाणी आलेल्या पुरामुळे शेती, दैनंदिन वस्तूंचे नुकसान झाले आहे.

The rain split up | पावसाने बोड्या फुटल्या

पावसाने बोड्या फुटल्या

Next
ठळक मुद्देसर्वेक्षण होणार : अनेक ठिकाणी जनजीवन पूर्वपदावर

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सोमवारी रात्री व मंगळवारी पावसाने उसंत घेतल्यानंतर नदी, नाल्यांचे पाणी कमी झाले आहे. पुलावरून पाणी ओसरल्याने भामरागड वगळता सर्वच मार्ग सुरू झाले आहेत. तर काही ठिकाणी आलेल्या पुरामुळे शेती, दैनंदिन वस्तूंचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी मार्गांवर सोमवारी झाडे कोसळली. त्यामुळे वाहतूक ठप्प पडली होती. पोलीस, सामान्य नागरिक यांच्या मदतीने झाडे तोडून वाहतूक सुरळीत करण्यात आली.
भामरागड - इंद्रावती नदीचा जलस्तर अजूनही वाढलेलाच आहे. त्यामुळे पर्लकोटा नदीचे पाणी पास होत नसल्याने पर्लकोटाचा पूर अजूनही कायम आहे. पुलावरून पाणी असल्याने भामरागडचा संपर्क तुटला आहे.
विसोरा - विसोरा परिसरातील शंकरपूर येथील पुरूषोत्तम भीमदास चंदनबटवे यांच्या शेतात पाण्याचा प्रवाह वाढल्याने त्यांच्या पिकाचे नुकसान झाले.
वैरागड - वैरागड-कढोली मार्गावरील नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत होते. मंगळवारी दुपारी १ वाजेपर्यंत या मार्गावरची वाहतूक बंद झाली होती. पुलावरून पाणी वाहत असतानाही काही वाहनधारक जीव धोक्यात घालून वाहन टाकत होते.
एटापल्ली - एटापल्ली तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे गेदा येथील गजानन सूरजागडे यांच्या शेतातील बोडी फुटली. त्यामुळे धानपिकाचे प्रचंड नुकसान झाले. जिल्हा परिषद सदस्य कल्पना प्रशांत आत्राम व तोडसाचे सरपंच प्रशांत आत्राम यांनी नुकसानीची पाहणी केली. तसेच एटापल्ली तालुकास्थळापासून २१ किमी अंतरावरील येमली साजातील मंगूठा गावातील तलाव फुटल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले.
सिरोंचा - आलापल्ली-सिरोंचा मार्गावर गर्कापेठा येथे मोहाचे झाड पडले. यामुळे वाहतूक ठप्प पडली होती. बामणी पोलिसांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक सुधीर घुले यांच्या नेतृत्वात पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने झाड कापला.
गोसेखुर्दच्या पाण्यामुळे पुन्हा पुराची शक्यता
सोमवारी झालेल्या पावसामुळे गोसेखुर्द धरणाच्या पाण्याची पातळी वाढली आहे. या धरणाचे १२ दरवाजे एक मीटरने उघडले आहेत तर २१ दरवाजे दीड मीटरने उघडले आहेत. यातून ९ हजार १०६ क्यूमेक्स एवढा पाण्याचा विसर्ग होत आहे. यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील मुख्य नदी असलेल्या वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. वैनगंगा दुथळी भरून वाहत असल्याने वैनगंगेच्या उपनद्या असलेल्या कठाणी, पाल, खोब्रागडी या नद्यांना दाब येऊन पाणीपातळी वाढली आहे. सखल भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पुरामुळे पुन्हा जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Web Title: The rain split up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.