पावसाने फिरविली पाठ, धानपीक आले संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 05:00 AM2021-08-15T05:00:00+5:302021-08-15T05:00:30+5:30
ज्या शेतकऱ्यांची राेवणी आटाेपली ती आता पावसाअभावी करपण्यास सुरुवात झाली आहे. राेवण्याबराेबरच रासायनिक खत टाकले जाते. त्यामुळे धानाला सतत पाण्याची गरज भासते. मात्र मागील १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. दुसरीकडे दिवसा कडक ऊन पडत असल्याने उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे दिवसा धान पीक माना टाकत आहे. पीक करपल्यास काय करावे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमाेर निर्माण झाला आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : मागील १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. ज्या शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही. अशा शेतामधील धानपीक करपायला लागले आहे. आणखी आठ दिवस पाऊस न आल्यास तलावातीलही पाणी संपण्याची भीती आहे.
मध्यंतरी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी धानाची राेवणी आटाेपली. तरीही १० टक्के राेवणीची कामे शिल्लक आहेत. पाणीच नसल्याने राेवण्या थांबल्या आहेत. राेवणीचा कालावधी निघून गेला आहे. त्यामुळे यानंतर जरी पाऊस आला तरी धान राेवणी न करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे ही शेतजमीन आता पडीकच राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ज्या शेतकऱ्यांची राेवणी आटाेपली ती आता पावसाअभावी करपण्यास सुरुवात झाली आहे. राेवण्याबराेबरच रासायनिक खत टाकले जाते. त्यामुळे धानाला सतत पाण्याची गरज भासते. मात्र मागील १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. दुसरीकडे दिवसा कडक ऊन पडत असल्याने उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे दिवसा धान पीक माना टाकत आहे. पीक करपल्यास काय करावे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमाेर निर्माण झाला आहे. गडचिराेली तालुक्यात ६५, कुरखेडा ७१, आरमाेरी ७२, चामाेर्शी तालुक्यात ८५ टक्के एवढाच पाऊस झाला आहे.
सिंचनाची सुविधा नाही. काय करावे. धान पीक आता करपायला लागले आहे. आता आमचे डाेळे आभाळाकडे लागले आहेत. विहिरीसाठी मागील तीन वर्षांपासून अर्ज केला आहे. मात्र विहीर मंजूर झाली नाही. काय करणार. शेती बेभरवशाचा राेजगार झाला आहे.
- अतुल बावणे, शेतकरी
मागील वर्षी पुराने हाेते नव्हते नष्ट केले. त्यामुळे यावर्षी तरी पीक हाेईल अशी अपेक्षा हाेती. मात्र अगदी सुरुवातीलाच पावसाने झटके देण्यास सुरुवात केली आहे. पुढे काय हाेणार हे अनिश्चित आहे. शेती करण्यापेक्षा नियमित मजुरी केलेली बरी त्यामुळे आपण शेतीकडे फारसे लक्ष न देता मजुरी करताे.
गणेश मडावी, शेतकरी
तलावांमध्ये २५ टक्केच पाणीसाठा
- यावर्षीच्या पावसात माेठा पाऊस झालाच नाही. जेमतेम राेवणी राेवण्याएवढाच पाऊस झाला. त्यामुळे जलासाठे केवळ २५ टक्केच भरले आहेत. पावसाने दडी मारल्याने त्यातील पाण्याचा वापर सुरू झाला आहे. मात्र हा जलसाठा केवळ आठ ते दहाच दिवस टिकण्याची शक्यता आहे. हा जलसाठा संपल्यास पुढे पीक कसे वाचवायचे, असा प्रश्न आहे.
- ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा नाही, अशा शेतकऱ्यांना तर पीक करपताना बघितल्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे दिसून येत आहे.
सरासरीच्या ८० टक्के पाऊस
१ जून ते १४ ऑगस्ट या अडीच महिन्यात सरासरी ८३१.४ मिमी पाऊस पडणे अपेक्षित हाेते. मात्र प्रत्यक्षात केवळ ६६६.७ मिमी एवढाच पाऊस झाला आहे. टक्केवारीमध्ये हे प्रमाण ८०.२ टक्के एवढे आहे. सिराेंचा तालुका वगळता सर्वच तालुक्यांमध्ये अपेक्षित पावसाच्या कमी प्रमाणात पाऊस झाला आहे. उकाड्यात वाढ झाली असल्याने सामान्य नागरिकही त्रस्त झाले आहेत. अनेकांनी कुलर सुरू केले आहेत.