पावसाने प्राणहितेचा जलस्तर वाढला
By admin | Published: June 17, 2017 01:57 AM2017-06-17T01:57:16+5:302017-06-17T01:57:16+5:30
गेल्या पाच-सहा दिवसांपासून विदर्भात मृगनक्षत्राचा पाऊस कुठेना कुठे पडत आहे. तसेच गुरूवारी दुपारच्या
वाहतूक बंद : पूल बांधकामावर परिणाम; पावसाळ्यात तेलंगणा-महाराष्ट्राचा संपर्क तुटणार
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : गेल्या पाच-सहा दिवसांपासून विदर्भात मृगनक्षत्राचा पाऊस कुठेना कुठे पडत आहे. तसेच गुरूवारी दुपारच्या सुमारास गडचिरोली जिल्ह्यातही पाऊस झाला. पावसामुळे अहेरी तालुका मुख्यालयापासून तीन किमी अंतरावर असलेल्या प्राणहिता नदीचा जलस्तर अचानक वाढला. दरम्यान कच्च्या रस्त्याने सुरू असलेली वाहतूक दुपारी २.३० वाजताच्या सुमारास अचानक बंद झाली. जलस्तर वाढल्यामुळे प्राणहिता नदीवरील पुलाच्या बांधकामावर परिणाम होणार आहे. पावसाळ्यात आणखी प्राणहिता नदीचा जलस्तर वाढून सदर मार्ग बंद होणार असल्याने महाराष्ट्र व तेलंगणाचा संपर्क तुटणार आहे.
गुरूवारी दुपारच्या सुमारास पाऊस झाल्याने अहेरीनजीकच्या प्राणहिता नदीचा जलस्तर वाढला. दरम्यान पूल बांधकामासाठी वाहनेही नदीपात्रात होती. पायदळ तसेच दुचाकीने लोकांचे येथील कच्च्या मार्गावरून आवागमन सुरू होते. मात्र पावसाने अचानक जलस्तर वाढल्याने पूल बांधकामावरील सर्व वाहने महाराष्ट्राच्या सीमेकडे ठेवण्यात आली. वाहतुकीसाठी तात्पुरत्या स्वरूपात तयार करण्यात आलेला कच्चा रस्ता अर्ध्यापेक्षा अधिक पाण्याखाली आला आहे. पाण्याचा प्रवाह या नदीपात्रात वाढला आहे. अचानक प्राणहिता नदीचा जलस्तर वाढल्याने पूल बांधकामात अडचण निर्माण झाली आहे. सध्या महाराष्ट्राच्या सीमेकडील पिलर उभारण्याचे बांधकाम सुरू आहे. जलस्तर वाढल्याने तेलंगणा व महाराष्ट्र राज्यातील वाहतूक थांबली आहे. येत्या काही दिवसात जोरदार पाऊस झाल्यास प्राणहिता नदीचा जलस्तर प्रचंड वाढण्याची शक्यता आहे. परिणामी दोन्ही राज्याचा संपर्क तुटणार असून नावेच्या साह्याने लोकांना प्रवास करावा लागणार आहे.
प्रसंगावधान राखल्याने युवक बचावला
अहेरी शहरातील एक युवक तेलंगणा राज्याच्या गुड्डेमकडून अहेरीकडे परत येत होता. गुरूवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास अचानक पाऊस आल्याने प्राणहिता नदीचा जलस्तर वाढला. दरम्यान सदर युवकाचा नदीपात्रात तोल गेल्याने अर्ध्या किमीपर्यंत तो वाहत गेला. मात्र त्याने वेळीच प्रसंगावधान दाखवून नदीपात्रातील एका झाडास पकडले. त्यामुळे त्याचा जीव वाचला. सदर युवकाला छोट्या नावेने नदीपात्रातून बाहेर काढण्यात आले. विशेष म्हणजे या घटनेचा काही नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये चित्रिकरण केले असल्याची माहिती आहे. या नदीपात्राच्या परिसरात पावसाळ्यात विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे.