पावसाने गाठली सरासरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 05:00 AM2020-08-24T05:00:00+5:302020-08-24T05:00:53+5:30
यावर्षी सुरूवातीला अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळेच रोवणीची कामे रखडली होती. शेतकरी चिंतेत पडला असतानाच १० दिवसांपूर्वी राज्यभरात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे कमी पडलेल्या पावसाची कसर भरून निघाली आहे. २३ ऑगस्टपर्यंत जिल्हाभरात ९५५.२ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात ९५४.५ मिमी पाऊस झाला आहे. अजुनही जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मागील १० दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने अपेक्षित सरासरीची कसर भरून काढली असून २३ आॅगस्टपर्यंत जिल्हयात अपेक्षित पावसाच्या ९९.९ टक्के पाऊस झाला आहे.
यावर्षी सुरूवातीला अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळेच रोवणीची कामे रखडली होती. शेतकरी चिंतेत पडला असतानाच १० दिवसांपूर्वी राज्यभरात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे कमी पडलेल्या पावसाची कसर भरून निघाली आहे. २३ ऑगस्टपर्यंत जिल्हाभरात ९५५.२ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात ९५४.५ मिमी पाऊस झाला आहे. अजुनही जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे पुन्हा काही दिवस पाऊस पडेल, अशी अपेक्षा आहे. असे झाल्यास अपेक्षित सरासरीच्या अधिकचे पाऊस पडू शकते.
जिल्ह्यात आता रोवणीची कामे आटोपली असून निंदनाची कामे सुरू आहेत. जिल्ह्यात जवळपास सप्टेंबर महिन्यापर्यंत पाऊस पडते. त्यानंतर पावसाचे प्रमाण कमी होते. धानपिकाला शेवटपर्यंत पाण्याची गरज भासते. अशा वेळी तलाव, बोड्यांमधील पाणी धान पिकाला दिले जाते. मागील आठ दिवसात झालेल्या पावसामुळे तललाव, बोड्या पूर्णपणे भरल्या आहेत. पाऊस सुरूच असल्याने पुन्हा १५ दिवस तलाव, बोड्यांच्या पाण्याची आवश्यकता भासणार नाही. त्यानंतर मात्र तलावबोड्या भरल्या असल्याने शेतकरी निश्चिंत आहेत.
देसाईगंज तालुक्यात सर्वात कमी पाऊस
यावर्षी देसाईगंज तालुक्यात सर्वात कमी म्हणजे, केवळ ६९१.३ मिमी पाऊस पडला आहे. या तालुक्यात २३ ऑगस्टपर्यंत ९८६.६ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात ६९१.३ मिमी पाऊस झाला आहे. अपेक्षित सररासरीच्या ७०.१ टक्के एवढा पाऊस झाला आहे. धानोरा तालुक्यात केवळ ७३९ मिमी पाऊस पडला आहे. अपेक्षित पावसाच्या ६९.२ टक्के एवढा आहे. गडचिरोली तालुक्यात ११०१.३ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात ७५५.४ मिमी एवढाच पाऊस झाला आहे. अपेक्षित सरासरीच्या केवळ ६८.६ टक्के एवढाच पाऊस झाला आहे. कुरखेडा तालुक्यात अपेक्षित सरासरीच्या ८७.५, आरमोरी ७९.७,चामोर्शी ९५.४, एटापल्ली ९४.२, कोरची ६९.२, देसाईगंज ७०.१ मिमी पाऊस झाला आहे. भामरागड तालुक्यात सर्वाधिक १३६२.६ मिमी पाऊस झाला आहे.