जिल्ह्यात गारपिटीसह पावसाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 11:56 PM2020-03-06T23:56:59+5:302020-03-06T23:57:32+5:30
आरमोरी - तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले. आष्टा परिसरात गार पडली. आरमोरी शहरातही सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास जवळपास १५ मिनीटे पाऊस झाला. त्यामुळे पावसाचे पाणी आरमोरी शहरातील रस्त्यांवर जमा झाले होते. अचानक आलेल्या पावसामुळे शहरातील नागरिकांची तारांबळ उडाली. आरमोरी येथे दर शुक्रवारी आठवडी बाजार भरते. अचानक आलेल्या पावसामुळे आठवडी बाजारातील विक्रेते व ग्राहकांची चांगलीच गैरसोय झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास झालेल्या गारपिट व पावसामुळे जिल्ह्याच्या अनेक भागात तारांबळ उडाली. गडचिरोली शहरात हलका पाऊस झाला असला तरी आरमोरी, मुलचेरा, कुरखेडा तालुक्यात अनेक ठिकाणी गारा पडल्या. आरमोरी येथे शुक्रवारचा आठवडी बाजार असल्यामुळे चांगलीच तारांबळ उडाली.
आरमोरी - तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले. आष्टा परिसरात गार पडली. आरमोरी शहरातही सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास जवळपास १५ मिनीटे पाऊस झाला. त्यामुळे पावसाचे पाणी आरमोरी शहरातील रस्त्यांवर जमा झाले होते. अचानक आलेल्या पावसामुळे शहरातील नागरिकांची तारांबळ उडाली. आरमोरी येथे दर शुक्रवारी आठवडी बाजार भरते. अचानक आलेल्या पावसामुळे आठवडी बाजारातील विक्रेते व ग्राहकांची चांगलीच गैरसोय झाली. बाजारात पाणी साचले होते.
मुलचेरा - तालुक्यात वादळ वाऱ्यासह पावसाने झोडपून काढले. जोराच्या वाऱ्यामुळे काही नागरिकांच्या घरांवरील टिनाचे पत्रे उडून गेले. मुलचेरा-आलापल्ली मार्गावर झाडे कोसळल्याने या मार्गावरून जड वाहने नेताना अडचण येत होती. आदिवासी विकास विभागामार्फत धान खरेदी सुरू आहे. मात्र काही शेतकऱ्यांच्या धानाचे अजूनही काटे झाले नाही. त्यामुळे त्यांचे धान केंद्रावर पडून आहे. पावसामुळे धान भिजले. काही ठिकाणी हलक्या स्वरूपात गाराही पडल्या.
कुरखेडा - तालुक्यात दुपारी २ वाजता वादळ व मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. कुरखेडा तालुक्यात अनेक धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचे धान उघड्यावर पडून आहेत. पावसामुळे उघड्यावरचे धान भिजले.
मानापूर/पलसगड - कुरखेडा तालुक्यातील पलसगड तसेच आरमोरी तालुक्यातील मानापूर, देलनवाडी परिसरात पाऊस झाला.