रेनवॉटर हार्वेस्टिंग कागदावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2019 12:19 AM2019-08-08T00:19:56+5:302019-08-08T00:20:19+5:30

प्रत्येक शासकीय व खासगी इमारतीमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगची सुविधा असणे शासनाने सक्तीचे केले आहे. कायदा करून पाच पेक्षा अधिक वर्षांचा कालावधी उलटला असला तरी गडचिरोली शहरातील एकाही खासगी व्यक्तीने रेन वॉटर हार्वेस्टिंगचे बांधकाम केले नाही.

Rainwater Harvesting on paper | रेनवॉटर हार्वेस्टिंग कागदावर

रेनवॉटर हार्वेस्टिंग कागदावर

Next
ठळक मुद्देअंमलबजावणीकडे दुर्लक्ष : गडचिरोलीत एकाही इमारतीला यंत्रणा नाही

दिगांबर जवादे।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : प्रत्येक शासकीय व खासगी इमारतीमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगची सुविधा असणे शासनाने सक्तीचे केले आहे. कायदा करून पाच पेक्षा अधिक वर्षांचा कालावधी उलटला असला तरी गडचिरोली शहरातील एकाही खासगी व्यक्तीने रेन वॉटर हार्वेस्टिंगचे बांधकाम केले नाही. नगर परिषद सुद्धा कारवाई तसेच जनजागृती करीत नसल्याने अनेकांना रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे काय आहे, हे सुद्धा माहित नसल्याचे दिसून येते.
पावसाळ्यात पडलेले पाणी वाहून जाते. परिणामी पूरपरिस्थिती निर्माण होते. तर उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागते. पावसाळ्यात मुबलक पाणी पडत असतानाही भूगर्भातील पाण्याचा वापर घरगुती कामासाठी केला जात नाही. पावसाळ्यातही जमिनीतील पाण्याचा उपसा सुरूच राहते. रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा बसवून पावसाचे पाणी एका टँकमध्ये जमा केल्यास जमिनीतील पाण्याचा उपसा कमी होईल. उन्हाळ्यात निर्माण होणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन रेन वॉटर यंत्रणा बसविणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाने कायदा केला आहे. त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी नगर परिषदेवर सोपविली आहे. पाच वर्षांच्या कालावधीत अधिकृत व अनाधिकृतरित्या हजारो घरांचे बांधकाम झाले आहे. मात्र एकाकडेही हार्वेस्टिंगची यंत्रणा नाही.

असे केले जाते जल पुनर्भरण
पावसाच्या पाण्याची साठवण (रेन वॉटर हार्वेस्टिंग) म्हणजे पुनर्वापरासाठी पावसाचे पाणी जमा करणे. पावसाचे पाणी घराच्या छतावरून एका मोठ्या जमिनीखालच्या टाकीमध्ये गोळा करतात. तर काही ठिकाणी साठवावयाचे पाणी खोल खड्डा (विहीर, शाफ्ट किंवा बोअरहोल), पाझर असलेल्या जलाशयांत साठवतात. माणसासाठी अपेय असलेले पाणी घरचा गार्डन, पशुधन, सिंचन वा घरगुती कामासाठी वापर करता येते.

जनजागृती व कारवाईची गरज
उन्हाळ्यात निर्माण होणारी पाणीटंचाई लक्षात घेतली तर रेन वॉटर हार्वेस्टिंगची यंत्रणा प्रत्येक घरी असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीनेच शासनाने कायदा सुद्धा केला आहे. मात्र हा कायदा नगर परिषद प्रशासनाच्या सहमतीने नागरिक पायदळी तुडवत आहेत. पावसाचे पाणी टँकमध्ये जमा करून त्याचा वापर केल्यास किमान पावसाळ्यात तरी जमिनीतील पाण्याचा उपसा थांबून भूजल पातळी वाढेल. या महत्त्वाच्या यंत्रणेविषयी अनेकांना माहितीच नसल्याचे दिसून येते. वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा अत्यंत कमी खर्चात बसविता येते. वॉटर हार्वेस्टिंगचे महत्त्व पटवून दिल्यास नागरिक ही यंत्रणा बसवतील. मात्र नगर परिषद तसेच इतर विभाग सुद्धा याबाबत जनजागृती करण्यात अपयशी ठरले आहेत. प्रत्येक बांधकामाच्या नियोजनात रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा सक्तीची करावी, अशी मागणी आहे.

वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा प्रत्येक इमारतीला सक्तीची करणे नगर परिषद प्रशासनाच्या विचाराधीन आहे. याबाबतचे नियोजन करून १५ आॅगस्टनंतर अंमलबजावणी केली जाईल. एवढेच नाहीतर वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा बसविण्याविषयी नागरिकांमध्ये जनजागृती सुद्धा केली जाईल. घर बांधकामाला परवानगी देतेवेळी अटी, शर्तींमध्ये वॉटर हार्वेस्टिंगचा उल्लेख करून त्याची अंमलबजावणी केली जाईल.
- संजीव ओहोळ, मुख्याधिकारी, नगर परिषद, गडचिरोली

Web Title: Rainwater Harvesting on paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.