पावसाच्या उसंतीमुळे आवत्याचे क्षेत्र वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 12:28 AM2018-06-18T00:28:01+5:302018-06-18T00:28:01+5:30
पावसाने उसंत दिल्याने धान उत्पादक शेतकऱ्यांनी पऱ्हे टाकण्याऐवजी आवत्या टाकण्यास पसंती दर्शवित आहेत. त्यामुळे यावर्षी आवत्याचे क्षेत्र वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : पावसाने उसंत दिल्याने धान उत्पादक शेतकऱ्यांनी पऱ्हे टाकण्याऐवजी आवत्या टाकण्यास पसंती दर्शवित आहेत. त्यामुळे यावर्षी आवत्याचे क्षेत्र वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
गडचिरोली जिल्ह्यात जवळास दीड लाख हेक्टरवर धान पिकाचे उत्पादन घेतले जाते. रोवणी व आवत्या हे धानाच्या लागवडीच्या प्रमुख दोन पध्दती आहेत. दरवर्षी जवळपास २० हजार हेक्टरवर आवत्या पध्दतीने धानाची लागवड केली जाते. आवत्या पध्दतीने धान लागवडीचा खर्च कमी आहे. जवळपास जून महिन्यात जमीन नांगरून, वखरून धानाचे बियाणे टाकले जाते. त्यानंतर फक्त एकदा नांगरले जाते. या पध्दतीत रोवणे करण्याची गरज पडत नाही. त्यामुळे रोवण्याचा खर्च वाचतो. दुर्गम भागातील शेतकरी त्याचबरोबर ज्या शेतीत सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही, अशा शेतीत आवत्या टाकल्या जातो. यावर्षी सुरूवातीला दमदार पाऊस झाला. त्यानंतर पावसाने उसंत घेतली आहे. त्यामुळे आवत्यासाठी जमिनीची मशागत करण्यास पुरेसा कालावधी मिळाला असल्याने शेतकरी अधिक प्रमाणात आवत्या टाकत आहेत. त्यामुळे यावर्षी आवत्याचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. आवत्यामुळे रोवणीचा खर्च वाचत असला तरी आवत्याचे उत्पादन कमी होत असल्याचा शेतकºयांचा अनुभव असल्याने काही शेतकरी आवत्या पध्दतीने धानाची लागवड करीत नाही. ते शेतकरी दरवर्षी रोवणीच करतात.