लसीकरणासाठी जनजागृती करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:44 AM2021-06-09T04:44:48+5:302021-06-09T04:44:48+5:30
साेमवारी विजय वडेट्टीवार यांनी जिल्ह्यातील कोरोना संसर्ग स्थिती, लसीकरण मोहीम, म्युकरमायकोसिस याबाबत आढावा घेतला. जिल्ह्यात कोरोना संसर्ग नियंत्रित ...
साेमवारी विजय वडेट्टीवार यांनी जिल्ह्यातील कोरोना संसर्ग स्थिती, लसीकरण मोहीम, म्युकरमायकोसिस याबाबत आढावा घेतला. जिल्ह्यात कोरोना संसर्ग नियंत्रित असून, आता लसीकरणासाठी नागरिक, पदाधिकारी व प्रशासन यांनी मिळून कार्य केले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
सभेला जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी उपस्थितांना कोविडबाबत माहिती दिली. या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, आमदार नाना पटोले, अभिजित वंजारी, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अनिल रुडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर उपस्थित होते.
जिल्ह्यात १.७२ लक्ष कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. ग्रामीण भागात स्थानिक लोकांना सोबत घेऊन त्यांचा आत्मविश्वास तयार करणे आवश्यक आहे. जनजागृती करून जास्तीत जास्त पात्र नागरिकांना लसीचे संरक्षण मिळणे आवश्यक असल्याचे आमदार नाना पटोले यांनी मत व्यक्त केले.
धान, मका खरेदीबाबत चर्चा
जिल्ह्यातील उचल न झालेल्या धानाबाबत चर्चा करून लवकरात लवकर धान उचल करण्याच्या सूचना मिलमालकांना देण्यात याव्यात अशा सूचना केल्या. जिल्ह्यात मका उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. शासनाकडून खरेदीप्रक्रिया सुरू करता येईल का यावर
या बैठकीत चर्चा झाली. मका हे उपयोगी असे खाद्य असून, त्याचा वापर दैनंदिन आहारात करता येईल. जरी मक्यामुळे चव बदलली तरी आहारात त्याचे महत्त्व जास्त आहे. स्थानिक आशा कार्यकर्ती तसेच प्रशासनाकडून मका खाण्याचे फायदे लोकांना पटवून दिले, तर जिल्ह्यातील मक्याचे झालेले उत्पन्न जिल्ह्यातच वापरता येईल यावरही बैठकीत चर्चा झाली.