दूध प्रकल्पाच्या चौकशीसाठी आवाज उठवावा
By admin | Published: October 17, 2015 02:00 AM2015-10-17T02:00:28+5:302015-10-17T02:00:28+5:30
गडचिरोली शहरालगतच्या शिवणी येथे शेतकऱ्यांच्या हितासाठी आ. विजय वडेट्टीवार यांनी शिवाणी दूध प्रकल्प सुरू केला होता.
पत्रकार परिषद : अतुल गण्यारपवार यांचा विजय वडेट्टीवारांना टोला
गडचिरोली : गडचिरोली शहरालगतच्या शिवणी येथे शेतकऱ्यांच्या हितासाठी आ. विजय वडेट्टीवार यांनी शिवाणी दूध प्रकल्प सुरू केला होता. या प्रकल्पाला सरकारचे अनुदानही त्यांनी मिळविले. नंतर हा प्रकल्प बंद झाला. या प्रकल्पाची चौकशी करण्यासाठी विधानसभेत आ. विजय वडेट्टीवार यांनी आवाज उठवावा व या भागातील शेतकऱ्याच्या मागणीला न्याय द्यावा, अशी भूमिका जिल्हा परिषदेचे बांधकाम व नियोजन सभापती अतुल गण्यारपवार यांनी पत्रकार परिषदेत शुक्रवारी मांडली.
अतुल गण्यारपवार म्हणाले की, चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीत १ कोटी १७ लाखांचा कुठलाही गैरव्यवहार झालेला नाही. १० कोटी रूपयांची कामे राष्ट्रीय कृषी विकास कार्यक्रमातून करण्यात आली. या कामासंदर्भात आ. विजय वडेट्टीवार यांनी तक्रार केली होती. त्याची चौकशीही पूर्ण करण्यात आली. त्यात बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या बाजूने निकाल लागलेला आहे. बाजार समितीचे काम करणाऱ्या कंत्राटदारांची चौकशी व्हावी म्हणून आपण मागील वेळी बाजार समितीचे सभापती असताना चौकशी समिती गठित केली होती. या चौकशी समितीने चौकशीचा ससेमेरा लावल्याने त्या कंत्राटदाराने आपल्या विरूद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली व खोट्या प्रकरणात आपल्याला अडकविले. १ कोटी १७ लाखांचा अपहार कंत्राटदाराने केला. या गैरव्यवहारासोबत बाजार समिती व आपला संबंध नाही. अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने काँग्रेस सदस्यांनी राहावे, अशी भूमिका वडेट्टीवार यांनी घेतली आहे ही बाब पेंटारामा तलांडी यांनीच आपल्याला सांगितली, असेही गण्यारपवार म्हणाले.
भ्रष्टाचाराच्या चौकशांचे पुढे काय होते हे जनतेला ठाऊक आहे
काँग्रेसच्या ज्या सदस्यांनी भाजप-सेना सदस्य असलेल्या बाजुने अविश्वासाच्या वेळी मतदान केले. त्यांच्या विरूद्ध काँग्रेसचे हे विधानसभेतील उपनेते काय कारवाई पक्षस्तरावरून करणार आहे, हे त्यांनी स्पष्ट करावे. एकीकडे वडेट्टीवार हे काँग्रेसचे विधीमंडळातील राज्याचे नेते आहे व त्यांच्याच भागात ही परिस्थिती घडलेली असताना ते याबाबत काहीही करण्याची भूमिका घेत नाही, ही अतिशय चिंतेची बाब असल्याचे गण्यारपवार यांनी सांगितले. वडेट्टीवार यांनी आपल्या राजकीय इतिहासात अनेक चौकश्या यापूर्वीही लावलेल्या आहे. त्या चौकशांचे पुढे काय होते, हे जनतेला चांगले ठाऊक आहे, असा उपरोधिक टोलाही गण्यारपवार यांनी यावेळी लगाविला. चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पद परमानंद मल्लीक या ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनाच देण्यात आला आहे. मल्लीक हे गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचे सक्रीय कार्यकर्ते असून काँग्रेसच्या जुन्या नेत्यांना याची जाण आहे. वडेट्टीवारांना कदाचित हा इतिहास माहित नसावा, असेही गण्यारपवार यावेळी म्हणाले. आपण काँग्रेस पक्षातील प्रवेशासाठी वडेट्टीवारांकडे कधीही विनंती केली नाही. देश व राज्यपातळीवर काँग्रेस पक्षात काम करणाऱ्या वडेट्टीवारांसारख्या नेत्यांनी स्थानिक राजकारणात जास्त ढवळाढवळ करू नये, असा सल्लाही गण्यारपवार यांनी दिला आहे. या देशाची न्याय व्यवस्था आपण लाचेच्या प्रकरणात दोषी आहो किंवा नाही, हे ठरवेल. हे ठरविण्याचा वडेट्टीवारांना तिळमात्र अधिकार नाही, असेही गण्यारपवार यांनी यावेळी म्हणाले.