राजाराम व घोटला वादळाचा तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 12:21 AM2019-05-03T00:21:46+5:302019-05-03T00:23:24+5:30
बुधवारी सायंकाळच्या सुमारास जिल्ह्यात अनेक ठिकाणी अचानक वादळवारा सुटला. या वादळामुळे ठिकठिकाणी झाडे कोसळली. अनेक झाडे वीज खांबांवर कोसळल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला. अहेरी तालुक्यातील राजाराम व चामोर्शी तालुक्यातील घोट परिसराला वादळाचा जोरदार तडाखा बसून वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली.
लोकमत न्यूज नेटवर्क
राजाराम (खां.)/घोट : बुधवारी सायंकाळच्या सुमारास जिल्ह्यात अनेक ठिकाणी अचानक वादळवारा सुटला. या वादळामुळे ठिकठिकाणी झाडे कोसळली. अनेक झाडे वीज खांबांवर कोसळल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला. अहेरी तालुक्यातील राजाराम व चामोर्शी तालुक्यातील घोट परिसराला वादळाचा जोरदार तडाखा बसून वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली.
राजाराम परिसरात बुधवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास अचानक वादळी पाऊस सुरू झाला. या वादळामुळे परिसरातील अनेक विद्युत खांबे कोसळली. त्यामुळे विद्युत तारा लोंबकळत होत्या. वीज खांब कोसळल्याने या भागातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. खांदला, पत्तीगाव, चिरेपल्ली, रायगट्टा, गोलाकर्जी आदी गावातील वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे नागरिकांना रात्र उकाड्यातच काढावी लागली.
परिसरात अनेक ठिकाणच्या विद्युत लाईनवर झाडे कोसळल्याने दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत झाडे काढण्याचे काम सुरू होते. दुपारपर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत झाला नव्हता. जवळपास दोन दिवस विद्युत पुरवठा सुरू होणार नाही, असे विद्युत कर्मचाऱ्यांचे म्हणणे होते. पंधवरड्यापूर्वी या भागात अवकाळी पाऊस झाला होता. यावेळीसुद्धा परिसराला वादळाचा जोरदार फटका बसल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते.
विकासपल्ली येथे वादळामुळे आंबा व मक्याचे नुकसान
चामोर्शी तालुक्यातील घोट परिसराला बुधवारी दुपारी ३.३० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत वादळाचा जोरदार फटका बसला. या भागातील विकासपल्ली येथे वादळाने प्रचंड नुकसान झाले. अनेक नागरिकांच्या घरावरील टिनपत्रे, कवेलू तसेच छत उडाले. तसेच परिसरातील अनेक विद्युत खांब तुटून पडल्याने वीज तारा अस्ताव्यस्त झाल्या. या भागात अनेक शेतकºयांनी मक्याची लागवड केली होती. परंतु वादळामुळे मका पीक पूर्णत: जमिनीवर सपाट झाले. तसेच वादळामुळे आंबा गळून पडला. काही दिवसातच आंब्यात कोई परिपक्व होणार होती. परंतु याच कालावधीत नुकसान झाल्याने शेतकºयांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. विकासपल्ली येथील जवळपास १३ घरांना वादळाचा फटका बसला. अनेक नागरिकांच्या घरावरील कवेलू व टिनपत्रे उडाल्याने जवळपास ८८ हजार रुपयांचे नुकसान झाले. वादळामुळे झालेल्या नुकसानीची माहिती महसूल विभागाच्या अधिकाºयांना देण्यात आली. त्यानंतर घोटचे मंडळ अधिकारी एस.जी.सरपे, मक्केपल्लीचे तलाठी एस.एम.कुरेशी यांनी विकासपल्ली येथे पंचनामा केला.
कवेलू व टिनपत्रे उडाली
राजाराम परिसरात अनेक ठिकाणी झाडे व विद्युत खांब कोसळले. येथील आरोग्य उपकेंद्रासमोर मोठ्या झाडाच्या फांद्या तुटून पडल्या. सुदैवाने येथे कुणीच नसल्याने जीवितहानी टळली. याशिवाय गावातील अनेक नागरिकांच्या घरावरील कवेलू व टिनपत्रे उडाली. त्यामुळे नागरिकांना प्रचंड नुकसान सोसावे लागले.