राजाराम परिसरात नियमाला बगल देऊन तेंदूपत्ता संकलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:39 AM2021-05-21T04:39:03+5:302021-05-21T04:39:03+5:30
संपूर्ण देशात काेराेना विषाणूच्या प्रादुर्भावाचा धाेका आहे. अशाही स्थितीत नागरिकांचा राेजगार बुडू नये यासाठी तेंदूपत्ता संकलनाचे काम करारनाम्यातील सूचना ...
संपूर्ण देशात काेराेना विषाणूच्या प्रादुर्भावाचा धाेका आहे. अशाही स्थितीत नागरिकांचा राेजगार बुडू नये यासाठी तेंदूपत्ता संकलनाचे काम करारनाम्यातील सूचना व नमूद नियमानुसार सुरू करण्यात आले. परंतु तेंदूपत्ता खरेदी करण्यासाठी आलेल्या ठेकेदारांकडून नियमांचा भंग होत आहे. गडचिराेली जिल्ह्यात तेंदू संकलन हे आर्थिक रोजगाराचे एक मोठे साधन आहे. नागरिकांना रोजगार मिळावा म्हणून प्रशासनाने योग्य उपाययोजना करण्याच्या अटीवरच तेंदूपत्ता संकलनाला मंजुरी दिली. यासाठी तेंदूपत्ता ठेकेदाराने संकलन केंद्रांवर सॅनिटायझर व मास्कची व्यवस्था करावी, तसेच २५ लोकांपेक्षा जास्त लोकांची गर्दी होणार नाही याची दक्षता बाळगणे, सामाजिक अंतर ठेवणे, जागृती करणारे बोर्ड अथवा पोस्टर प्रत्येक संकलन केंद्रावर लावणे आदी नियम ठेकेदारांसाठी घालून दिले. तसा उल्लेख प्रत्येक करारनाम्यात केला. राजाराम येथेही करारनामा करताना सदर बाबी नमूद हाेत्या; मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले. सध्या तेंदू संकलन केंद्रावर नियमांची पायमल्ली हाेत आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराला याबाबत सूचित करावे तसेच त्यानुसार नियमांचे पालन करून साेयीसुविधा पुरविण्यासाठी सांगावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. याकडे संबंधित विभागाचे अधिकारी कानाडोळा करीत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची गरज परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहेत.
बाॅक्स
परजिल्ह्यातील मजूर पाेहाेचले कसे?
राजाराम परिसरात तेंदूपत्ता संकलन करण्याचे काम मोठ्या जोमाने सुरू आहे. परंतु तेंदूपत्ता संकलनाच्या कामात असलेल्या काही व्यक्ती बाहेर जिल्ह्यातील आहेत. त्यांनी काेराेना टेस्ट केलेले प्रमाणपत्र, ई-पास तसेच काेराेना प्रतिबंधक लस घेतल्याचे प्रमाणपत्र आदी कागदपत्रे बाळगणे आवश्यक आहेत. शासनाने ठरवून दिलेले नियम पाळणे बंधनकारक आहे; मात्र असे कुठेही नियमानुसार असल्याचे चित्र दिसून येत नाही.
===Photopath===
200521\20gad_2_20052021_30.jpg
===Caption===
तेंदूपत्ता संकलन केंद्रावर अशाप्रकारे सुविधांचा अभाव असून गर्दी हाेत आहे.