पाऊले चालती राजनांदगावची वाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 05:00 AM2020-04-18T05:00:00+5:302020-04-18T05:00:41+5:30
ब्रम्हपुरी येथे बोअरवेलच्या कामावर गेलेले सहा तरुण गुरूवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास विसोरा-शंकरपूर मार्गे छत्तीसगढ राज्यातील राजनांदगांव जिल्ह्यात आपल्या मूळ गावी जाण्यासाठी पायदळ प्रवासाला निघाले आहेत. ब्रह्मपुरी ते राजनांदगांव अशा तब्बल १७० किलोमीटर अंतराच्या पायी प्रवासाकरिता पहाटेच ब्रह्मपुरी नगर सोडल्याचे त्यांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
विसोरा : घर सोडून आपण कुठेही बाहेर राहायला गेलो तरी घराची ओढ आपणास शांत बसू देत नाही. त्यात सध्याच्या कोरोनामय वातावरणात कडक संचारबंदी, राज्य आणि जिल्हा सीमा बंदी असताना स्थलांतरित मजुरांना मात्र घराकडे जाण्याचा मोह आवरता येईना अशी अवस्था झाल्याचे दिसून येते आहे. ब्रम्हपुरी येथे बोअरवेलच्या कामावर गेलेले सहा तरुण गुरूवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास विसोरा-शंकरपूर मार्गे छत्तीसगढ राज्यातील राजनांदगांव जिल्ह्यात आपल्या मूळ गावी जाण्यासाठी पायदळ प्रवासाला निघाले आहेत.
ब्रह्मपुरी ते राजनांदगांव अशा तब्बल १७० किलोमीटर अंतराच्या पायी प्रवासाकरिता पहाटेच ब्रह्मपुरी नगर सोडल्याचे त्यांनी सांगितले. परंतु ब्रह्मपुरी ते देसाईगंज या आंतरजिल्हा रस्त्यावरच्या वैनगंगा नदीवरील पुलावर पोलीस चौकी असताना तुम्ही कसे काय आले, असा प्रश्न केला असता. आम्हाला कुणीच अडवला नसल्याचे ते बोलले. राजनांदगांवकडे पायदळ जाणाऱ्या चार तरुणांच्या पाठीवर एक-एक बॅग आणि दोघांच्या हातात कापडी पिशवी होती. एकाने तोंडावर मास्क तर एकाने रुमाल बांधली. पिण्याच्या पाण्याशिवाय खाण्यासाठी त्यांच्याकडे काहीच नव्हते. संचारबंदी वाढल्याने बसेसची व्यवस्था नाही. हे लक्षात आल्यावर त्यांनी पायदळ प्रवास सुरू केला.
जिल्ह्याबाहेरून येणाऱ्यांचे गावातच विलगिकरण
नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात चणा काढणी, धानकापणी, मिरची तोडणी या कामासाठी शंकरपूर, कसारी येथील महिला, पुरुष गेले होते. हे सर्व मजूर आता घरी परतले असून त्यांना गावातील जिल्हा परिषद शाळा वा अन्य ठिकाणी विलगिकरणात ठेवले आहे. कोरोना विषाणूची लागण होण्याच्या भीतीपोटी बाहेरगावी कामावर गेलेले गावातील नागरिक आता घरी वापस येत असले तरी कुटुंबातील सदस्यही त्यांच्याकडे संशयाच्या नजरेने पाहत आहेत. गावातील दक्षता समिती बाहेरगावाहून गावांत येणाºया प्रत्येक व्यक्तीवर लक्ष ठेवून आहे. गावात येताच त्यांना विलग केल्या जात आहे.