निरक्षर आई-वडिलांनी मजुरी करून शिकवले; पोरानेही नाव केले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2023 11:20 AM2023-06-16T11:20:43+5:302023-06-16T11:22:34+5:30

सिराेंचातील राजू बनणार डॉक्टर : दोनवेळा हार, तिसऱ्यांदा ‘नीट’नेटके यश

Raju Durgam from Sironcha passed 'NEET', will become a doctor | निरक्षर आई-वडिलांनी मजुरी करून शिकवले; पोरानेही नाव केले

निरक्षर आई-वडिलांनी मजुरी करून शिकवले; पोरानेही नाव केले

googlenewsNext

कौसर खान

सिरोंचा (गडचिरोली) : आई-वडील निरक्षर, घरची गरिबी, जेमतेम दोन एकर शेती, त्यामुळे मजुरीशिवाय जगण्याला दुसरा आधार नाही; मात्र अशाही परिस्थितीत आई-वडिलांनी मुलाला शिक्षण दिले अन् त्यानेही जिद्दीने अभ्यास करून डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने यशाला गवसणी घातली. तिसऱ्या प्रयत्नात त्याने यशाला गवसणी घालून आयुष्याला ‘नीट’नेटके वळण दिले. सिरोंचा तालुक्यातील टेकडा (ताल्ला) गावचा भूमिपुत्र राजू राजलिंगू दुर्गम या तरुणाच्या प्रेरणादायी प्रवासाचा हा धांडोळा...

महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील सिरोंचा तालुक्यातील आलापल्ली रोडवर टेकडा (ताल्ला) हे दुर्गम भागातील गाव आहे. सिरोंचापासून ३५ किलोमीटरवरील या गावातील राजू दुर्गम हा सध्या नीट परीक्षेतील घवघवीत यशामुळे चर्चेत आहे. आई-वडील, दोन मुले, एक मुलगी असा हा पाच जणांचा कुटुंबकबिला.

त्याचे आई-वडील कधीही शाळेत गेले नाहीत; पण शिक्षणाचे महत्त्व त्यांना उमगले होते. दोन एकर शेती, त्यातील उत्पन्नावर घर चालविणे शक्य नसल्याने मोलमजुरीशिवाय दुसरा पर्याय नाही. अशाही परिस्थितीत चिनक्का राजलिंगू दुर्गम व राजलिंगू रामय्या दुर्गम यांनी राजूच्या शिक्षणासाठी पैसा कमी पडू दिला नाही. राजूचा मोठा भाऊ राकेश बारावीपर्यंत शिकला असून, हैदराबादला मजुरीकाम करतो. मुलगी रजनीचा विवाह लावून दिला. राजूचे दुसरीपर्यंतचे शिक्षण टेकडा ताल्ला येथे इंग्रजी शाळेत झाले. त्यानंतर तिसरी ते दहावीपर्यंत त्यांनी नागेपल्लीच्या शाळेत शिक्षण घेतले.

दहावीला ८२ टक्के मिळवून राजूने आई-वडिलांच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले. राजूच्या यशाने आई-वडिलांनाही हुरूप आला. त्यांनी त्याला पुढील शिक्षणासाठी पुण्याला पाठविले. पुणे येथील वाडिया महाविद्यालयात त्याने अकरावी व बारावीचे शिक्षण घेतले. त्यानंतर लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट संस्थेच्या माध्यमातून नीट परीक्षेच्या नि:शुल्क वर्गात त्याला प्रवेश मिळाला. यासाठी त्याला एक पूर्वपरीक्षा द्यावी लागली, त्यातून त्याची संस्थेने मोफत वर्गासाठी निवड केली.

तिसऱ्या प्रयत्नात पाचशेपार

राजू दुर्गमला नीट परीक्षेत पहिल्या प्रयत्नात जेमतेम १९६ गुण मिळाले, दुसऱ्या वेळी ४१६ गुण मिळाले; मात्र तो खचला नाही. त्याने पुन्हा जोमाने अभ्यास केला. यावेळी त्यास ६४३ गुण मिळाले, त्यामुळे त्याचा एमबीबीएस प्रवेशाचा मार्ग सुकर झाला आहे.

लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट संस्थेच्या माध्यमातून डॉ. अतुल ढाकणे हे होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना नीटच्या तयारीसाठी नि:शुल्क वर्ग घेतात, या वर्गासाठी निवड झाल्याने मी डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करीत आहे. आई- वडिलांसह गुरुजनांनाही याचे श्रेय जाते. डॉक्टर बनून दुर्गम भागातील वंचित, उपेक्षितांची सेवा करायची आहे.

- राजू दुर्गम

Web Title: Raju Durgam from Sironcha passed 'NEET', will become a doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.