रॅलीतून कुणबी समाजबांधवांचे शक्तीप्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 09:47 PM2018-12-25T21:47:51+5:302018-12-25T21:48:16+5:30
ओबीसी प्रवर्गात मोडणाऱ्या कुणबी समाजाची दैनावस्था व त्यातल्यात्यात शासनाकडून ही जात दुर्लक्षित असल्याने कुणबी समाजावर अन्यायाचे प्रमाण वाढले आहे. कुणबी समाजाला आरक्षण देऊन न्याय देण्यात यावा, यासह विविध मागण्यांकरिता कुणबी समाजबांधवांचा महामोर्चा २७ डिसेंबर रोजी गुरूवारला जिल्हा कचेरीवर धडकणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : ओबीसी प्रवर्गात मोडणाऱ्या कुणबी समाजाची दैनावस्था व त्यातल्यात्यात शासनाकडून ही जात दुर्लक्षित असल्याने कुणबी समाजावर अन्यायाचे प्रमाण वाढले आहे. कुणबी समाजाला आरक्षण देऊन न्याय देण्यात यावा, यासह विविध मागण्यांकरिता कुणबी समाजबांधवांचा महामोर्चा २७ डिसेंबर रोजी गुरूवारला जिल्हा कचेरीवर धडकणार आहे. या मोर्चाला भरघोस प्रतिसाद मिळावा, या उद्देशाने कुणबी समाजाच्या वतीने मंगळवारी गडचिरोली, चामोर्शी शहर, आरमोरी तालुक्यातील वडधा व इतर गावांमध्ये बाईक रॅली काढून जनजागृती करण्यात आली.
कुणबी महामोर्चाचे नेतृत्व जिल्ह्यातील युवक, युवती व विद्यार्थिनी करणार आहेत. या महामोर्चाला प्रामुख्याने खासदार भावना गवळी, खासदार मधुकर कुकडे, माजी खासदार नाना पटोले, आमदार बच्चू कडू, आमदार सुनील केदार, आमदार बाळू धानोरकर, आमदार संजय धोटे, आमदार यशोमती ठाकूर, आमदार परिणय फुके, आमदार पंकज भोयर, माजी मंत्री संजय देवतळे, माजी आमदार वामनराव चटप आदी उपस्थित राहून समाजबांधवांना संबोधित करणार आहेत.
सदर मोर्चाच्या अनुषंगाने कुणबी समाज संघटनेच्या वतीने चामोर्शी, आरमोरी, देसाईगंज तालुक्यासह इतर ठिकाणच्या मोठ्या गावांमध्ये बैठका व कार्यक्रम घेऊन समाजाच्या एकजुटीसाठी जनजागृती करण्यात आली आहे. गडचिरोली येथेही कुणबी समाज संघटनेचे कार्यालय सुरू करून येथे रात्रीच्या सुमारास दररोज बैठका घेतल्या जात आहेत. गडचिरोली शहरासह जिल्ह्याच्या अनेक ठिकाणी सदर मोर्चाच्या अनुषंगाने फलक लावण्यात आले आहे.
कुणबी समाज संघटनेच्या वतीने समाजाच्या एकतेची मुठ बांधण्यासाठी टी-शर्ट तयार करण्यात आल्या असून टोप्याही तयार झाल्या आहेत. कुणबी समाज संघटनेच्या वतीने स्थानिक चामोर्शी मार्गावरील शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणातून कुणबी समाजाचा महा-मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. या मोर्चात कुणबी समाजातील अनेक मान्यवर, राजकीय पदाधिकारी, विविध संघटनांचे पदाधिकारी, विद्यार्थी, युवक, युवती व सर्वचस्तरातील बांधव सहभागी होणार आहेत.
महामोर्चाच्या निमित्ताने गुरूवारला गडचिरोली येथे जिल्ह्यासह लगतच्या गावातील कुणबी समाजबांधव वाहनाने दाखल होणार आहेत. त्यादृष्टीने वाहन पार्र्किंगची व्यवस्थाही संघटनेच्या वतीने शहराच्या मोकळ्या जागेत करण्यात आली आहे. सदर मोर्चादरम्यान कुठलीही अनुचित घटना घडू नये, यासाठी चोख पोलीस बंदोबस्त शिवाजी कॉलेज परिसर व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात ठेवण्यात येणार आहे.
या आहेत महामोर्चाच्या मागण्या
कुणबी जातीचा समावेश एसईबी प्रवर्गात करून कुणबी समाजाला १६ टक्के आरक्षण देण्यात यावे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी जशाच्या तशा लागू कराव्या, नोकरभरती संदर्भातील पेसा अंतर्गत राज्यपालांनी निर्गमित केलेल्या अधिसूचनेत सुधारणा करून सर्व प्रवर्गातील स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यात यावे, कुणबी जातीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनीसाठी स्वतंत्र वसतिगृहाची निर्मिती करून एससी, एसटीप्रमाणे सर्व अभ्यासक्रमासाठी १०० टक्के शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात यावा, धानाला प्रति क्विंटल चार हजार रूपये हमीभाव देण्यात यावा, शासनाने गठीत केलेल्या जनजाती सल्लागार समितीचा अहवाल तत्काळ जाहीर करून निर्णयातील तरतूदीनुसार कार्यवाही करावी, वेगळ्या विदर्भ राज्याची निर्मिती करण्यात यावी, कुणबी जातीला अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत संरक्षण देण्यात यावे, कुणबी जातीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण देण्यासाठी परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात यावा आदी मागण्यांचा समावेश आहे. या मागण्या शासनस्तरावर पोहोचवून शासनाला निर्णय घेण्यास भाग पाडण्यासाठी कुणबी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा जिल्हा कचेरीवर गुरूवारला धडकणार आहे.
५० हजारांवर कुणबी बांधव एकवटणार
कुणबी महामोर्चाच्या निमित्ताने जिल्हाभरातील कुणबी समाजाला संघटित करण्याचे काम समाज संघटनेच्या वतीने गेल्या एक ते दीड महिन्यापासून सुरू आहे. महामोर्चाच्या जनजागृतीसाठी सोशल मीडियाचाही मोठ्या प्रमाणात वापर सुरू आहे. महामोर्चाच्या निमित्ताने समाजातील मोठे नेते एकत्र येणार असल्याने तसेच आपल्या न्याय हक्कासाठी या मोर्चाच्या माध्यमातून जिल्हाभरातील ५० हजारांवर कुणबी समाजबांधव गुरूवारी एकवटणार आहेत. मोर्चाच्या जनजागृतीसाठी मंगळवारी काढण्यात आलेल्या गडचिरोली शहरातील बाईक रॅलीमध्ये कुणबी समाजाच्या महिला, युवती व विद्यार्थिनीही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. शहरातील प्रमुख मार्गाने दुचाकीने फिरून समाजबांधवांनी कुणबी एकतेचा प्रत्यय जिल्हावासीयांना आणून दिला.