रामय्यापेठाची रेणुका बनणार कर सहायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 10:56 PM2019-05-06T22:56:34+5:302019-05-06T22:57:32+5:30
आलापल्लीपासून सहा किमी अंतरावर असलेल्या रामय्यापेठा येथील रेणुका राजाराम निकुरे या विद्यार्थिनीने गरीब परिस्थितीवर मात करीत कर सहायक वर्ग-३ पदाची परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. ती महाराष्ट्रातून ओबीसी प्रवर्गातून १७ वी आली आहे. तिचे हे यश जिल्ह्यातील इतर युवकांसाठी मार्गदर्शक ठरणारे आहे.
प्रशांत ठेपाले।
लोकमत न्यूज नेटवर्क
आलापल्ली : आलापल्लीपासून सहा किमी अंतरावर असलेल्या रामय्यापेठा येथील रेणुका राजाराम निकुरे या विद्यार्थिनीने गरीब परिस्थितीवर मात करीत कर सहायक वर्ग-३ पदाची परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. ती महाराष्ट्रातून ओबीसी प्रवर्गातून १७ वी आली आहे. तिचे हे यश जिल्ह्यातील इतर युवकांसाठी मार्गदर्शक ठरणारे आहे.
रेणुकाचे प्राथमिक शिक्षण गावातच रामय्यापेठा येथे पूर्ण झाले. पाचवी ते दहावीपर्यंत ती राणी दुर्गावती विद्यालय आलापल्ली येथे शिकली. रेणुकाची हुशारी, परिश्रम करण्याची जिद्द ओळखून राणी दुर्गावती विद्यालयाचे प्राचार्य गजानन लोनबले व वनवैभव शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अब्दुल जमीर हकीम यांनी तिला पदवीच्या शिक्षणानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याचा सल्ला दिला. मात्र घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असल्याने पदवीचे शिक्षण व स्पर्धा परीक्षेची तयारी या गोष्टी न झेपणाऱ्या होत्या. त्यामुळे रेणुकाच्या आईवडिलांनी तिला पुढील शिक्षण देण्यास नकार दिला. मात्र तिच्या पुढील शिक्षणाच्या खर्चाची जबाबदारी प्राचार्य लोनबले व अब्दुल हकीम यांनी उचलण्याचे आश्वासन दिले.
पदवीच्या शिक्षणासाठी तिला वरोरा येथील आनंद निकेतन महाविद्यालयात पाठविण्यात आले. तिच्या राहण्याची सोय प्राचार्य लोनबले यांनी स्वत:च्या घरी केली. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी तिला जळगाव येथे पाठविण्यात आले. जळगाव येथील दीपस्तंभ फाऊंडेशनचे प्रा.येजुवेंद्र महाजन यांनी मदत केली. जळगाव येथे रेणुकाने स्पर्धा परीक्षेची जिद्दीने तयारी केली. त्यात तिला यश मिळाले असून तिने कर सहायकाची परीक्षा उत्तीर्ण केली. रेणुकाचे वडील शेतकरी असून आई भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करते. अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करीत रेणुकाने यश संपादन केले. तिचे हे यश स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे.
स्पर्धा परीक्षेसाठी जिद्द महत्त्वाची - रेणुका
स्पर्धा परीक्षेची तयारी करताना गरीब विद्यार्थ्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. गरीबी व अभ्यास या दोन बाबींशी त्याला संघर्ष करावा लागतो. मात्र यावर मात करून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला एमपीएससीच्या परीक्षेत यश प्राप्त होते. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करून अधिकाऱ्याची नोकरी मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे, अशी प्रतिक्रिया रेणुका निकुरे हिने लोकमतशी बोलताना व्यक्त केली.