आजी-नातवासह तिघांच्या मृत्यूने हळहळले राममोहनपूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:44 AM2021-09-17T04:44:09+5:302021-09-17T04:44:09+5:30
या घटनेत राजू रामकृष्ण विस्वास (वय १९), कमला मनिंद्र विस्वास (६५) आणि वीरकुमार सुभाष मंडल (११) या तिघांचा जागीच ...
या घटनेत राजू रामकृष्ण विस्वास (वय १९), कमला मनिंद्र विस्वास (६५) आणि वीरकुमार सुभाष मंडल (११) या तिघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आमदार डॉ. होळी यांनी गुरुवारी मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी प्रामुख्याने भाजप बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा व उपसरपंच प्रकाश सरकार व गावकरी उपस्थित होते.
(बॉक्स)
अशी झाली घटना
मृतांचे कुटुंबीय शेतीसोबत मत्स्यव्यवसाय करतात. त्यांच्या शेतात मत्स्यतलाव आहे. त्या तलावातून रात्री माशांची चोरी होऊ नये म्हणून विद्युत बल्ब लावण्यासाठी मृत राजू विस्वास शेतात गेला होता. परंतु, तो घरी परत आला नाही. फोन लावला असता तो फोनही उचलत नव्हता. त्यामुळे आजी कमला शेजारच्या वीरकुमार या मुलाला घेऊन शेतात गेली. तिथे राजू बेशुद्ध होऊन पडलेला दिसला. त्याला काय झाले म्हणून पाहण्यासाठी हात लावला असता कमला व वीरकुमार यांनाही विजेचा धक्का लागला आणि ते तिथेच पडले.
(बॉक्स)
थोडक्यात बचावली वासंती
शेतावर गेलेले कोणीही घरी परत न आल्याने वासंती सुभाष विस्वास ही शेतावर पाहण्यासाठी गेली. तिथे सर्वजण निपचित पडून होते. वासंती हिनेसुद्धा मृतांना हात लावण्याचा प्रयत्न केला, परंतु तिला विजेचा हलका धक्का बसला आणि ती लगेच मागे हटली. तिने झालेल्या प्रकाराची माहिती गावातील लोकांना दिली. गावकऱ्यांनी वीज प्रवाह बंद करून तिन्ही मृतांना घरी आणले आणि नंतर शवविच्छेदनाकरिता आष्टी रुग्णालयात दाखल केले.