रांगीत प्रकल्पस्तरीय क्रीडा संमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 10:48 PM2018-09-24T22:48:56+5:302018-09-24T22:49:10+5:30
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत रांगी येथील शासकीय माध्यमिक शाळेच्या क्रिडांगणावर मंगळवारपासून तीनदिवसीय प्रकल्पस्तरीय क्रीडा संमेलन आयोजित करण्यात आले आहे. यात गडचिरोली प्रकल्पातील ४३ आश्रमशाळेतील एकूण १ हजार ४६ खेळाडूंना क्रीडाकौशल्य प्रदर्शीत करण्याची संधी प्राप्त झालेली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत रांगी येथील शासकीय माध्यमिक शाळेच्या क्रिडांगणावर मंगळवारपासून तीनदिवसीय प्रकल्पस्तरीय क्रीडा संमेलन आयोजित करण्यात आले आहे. यात गडचिरोली प्रकल्पातील ४३ आश्रमशाळेतील एकूण १ हजार ४६ खेळाडूंना क्रीडाकौशल्य प्रदर्शीत करण्याची संधी प्राप्त झालेली आहे.
या क्रीडा संमेलनाचे उद्घाटन खा.अशोक नेते यांच्या हस्ते २५ सप्टेंबरला सकाळी ९ वाजता होणार आहे. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी शेखर सिंह तर विशेष अतिथी म्हणून आ.डॉ.देवराव होळी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय राठोड उपस्थित राहणार आहेत. याशिवाय प्रमुख अतिथी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक शशिकांत साळवे, रांगीचे सरपंच जगदीश कन्नाके, उपसरपंच नरेंद्र भुरसे, पोलीस पाटील रामचंद्र काटेंगे, प्रकाश काटेंगे, शाळा समितीचे अध्यक्ष जांबुवंत पेंदाम आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. प्रकल्प अधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी प्रत्यक्ष रांगी येथे भेट देऊन संमेलनाच्या तयारीचा आढावा नुकताच घेतला. क्रीडा संमेलनात कारवाफा, भाडभिडी, सोडे, अंगारा, कोरची या पाच बिटातील २५ शासकीय व १८ अनुदानित अशा एकूण ४३ आश्रमशाळेतील खेळाडू विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या संमेलनात कबड्डी, खो-खो, व्हॉलिबॉल, हॅन्ड बॉल या सांघिक खेळासह धावणे, लांबउडी, उंच उडी, गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक आदी वैयक्तिक खेळाचे आयोजन करण्यात आले आहे.
२७ ला पारितोषिक वितरण
प्रकल्प अधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांच्या हस्ते २७ सप्टेंबरला सायंकाळी ४ वाजता विजेते खेळाडू व संघाला पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सहायक प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार उपस्थित राहणार आहेत. संमेलन यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक सुरेश पिल्लारे यांच्यासह २०० कर्मचारी प्रयत्न करीत आहेत.