रानडुकराची शिकार, तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 12:56 AM2018-01-17T00:56:33+5:302018-01-17T00:56:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : रानडुकराची शिकार करून त्याची ट्रॅक्टरद्वारे वाहतूक करणाऱ्या आरोपींना वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अटक केली आहे. सदर घटना १६ जानेवारी रोजी घडली.
रानडुकराची शिकार करून ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाहतुक केली जात असल्याची गोपनीय माहिती वन कर्मचाऱ्यांना प्राप्त झाली. त्यानुसार आरमोरी- गडचिरोली मार्गावरील पोर्ला येथील वडधा फाट्यावर ट्रॅक्टर अडवून तपासणी केली. त्यामध्ये एक मृत रानडुकर आढळून आला. या प्रकरणी अवतारसिंग कतारसिंग डांगी रा. इंजेवारी, गोविंदसिंग हुकूमसिंग डांगी रा. इंजेवारी, नरेश अशोक तोंडरे रा. देऊळगाव यांना अटक केली. त्यांची चौकशी केली असता, आरोपींनी सांगितले की अवतारसिंग याने साखरा नियतक्षेत्रात कक्ष क्रमांक ५ मध्ये १५ जानेवारी रोजी रानडुकराची शिकार करण्यासाठी सायंकाळी बारूदीचे गोळे ठेवले होते. १६ जानेवारी रोजी सकाळी गोविंदसिंग डांगी हा दुचाकीने तेथे गेला. त्या ठिकाणी एक रानडुकर बारूद गोळा खाऊन मृतावस्थेत आढळला. गोविंदसिंग याने देऊळगाव येथील नरेश तोंडरे याला ट्रॅक्टर आणण्यास सांगितले. त्यानंतर डुकराला ट्रॅक्टरमध्ये मांडून ते गडचिरोलीकडे आणले जात होते. दरम्यान पोर्लाजवळ सापळा रचून पकडण्यात आले.
या अगोदर या आरोपींनी काही वन्यजीव अशाच प्रकारे मारले असल्याची शक्यता निर्माण झाली असल्याने त्या दृष्टीने वन विभागाचे कर्मचारी आरोपींची चौकशी करीत आहेत. सदर कारवाई सहायक वनरक्षक डी. पी. चौडीकर, पोर्लाचे वन परिक्षेत्राधिकारी ए. बी. साळवे यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहायक विजय कंकालवार, व्ही. बी. राजूरकर, एस. जे. ताजणे, वनरक्षक आर. व्ही. आसलवार, नितीन तुम्पल्लीवार, नितीन गडपायले, विलास समर्थ, व्ही. बी. पावडे, अनंत मेश्राम, नरोटे, सरकार आदींनी केली.