वन्यजीव प्रगणनेत आढळल्या दुर्मीळ रानम्हशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 10:53 PM2018-01-21T22:53:00+5:302018-01-21T22:53:15+5:30
वन विभागाने वन्यजीव प्रगणनेला २० जानेवारीपासून सुरूवात केली आहे. यादरम्यान कमलापूर वन परिक्षेत्रातील खंड क्रमांक ५४ ला लागून असलेल्या इंद्रावती नदीपात्रात दुर्मीळ रानम्हशींचे दर्शन झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कमलापूर : वन विभागाने वन्यजीव प्रगणनेला २० जानेवारीपासून सुरूवात केली आहे. यादरम्यान कमलापूर वन परिक्षेत्रातील खंड क्रमांक ५४ ला लागून असलेल्या इंद्रावती नदीपात्रात दुर्मीळ रानम्हशींचे दर्शन झाले आहे.
कमलापूर वन परिक्षेत्रातील १४० वर्ग किलोमीटरच्या परिसरात रानम्हशींच्या संवर्धनासाठी सन २०१२ मध्ये कोलामार्का संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. यावेळी याठिकाणी केवळ १२ रानम्हशी होत्या. या म्हशी दुर्मीळ असल्याने त्यांची संख्या वाढविण्याच्या दृष्टीने वन विभागाने विविध उपाययोजना केल्या. या म्हशींची शिकार होणार नाही. यासाठी खबरदारी घेतली. जंगलामध्ये छोटे-मोठे पाणवटे, खोदतळे तयार करून त्यांना पाण्याची व्यवस्था केली. त्यामुळे या परिसरात रानम्हशींची संख्या वाढली असल्याचे दिसून येत आहे. या परिसरात सद्यस्थितीत २८ च्या वर रानम्हशींचे अस्तित्त्व असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेला छत्तीसगड राज्याची सीमा लागून आहे. त्यामुळे या ठिकाणीसुद्धा या म्हशींचे आवागमन सुरू राहते. कमलापूर परिसरात घनदाट जंगल आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात गवत उपलब्ध असल्याने रानम्हशींच्या आरोग्यासाठी हा परिसर अतिशय योग्य मानला जातो. ही बाब लक्षात घेऊनच रानम्हशी संवर्धन क्षेत्र म्हणून या परिसराला घोषित करण्यात आले आहे. कोलामार्का संवर्धन क्षेत्रात रानम्हशींसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी रानम्हशींचे अस्तित्त्व वाढले आहे. त्यांची संख्या आणखी वाढण्यासाठी वन विभाग आवश्यक ते प्रयत्न करेल, अशी माहिती सिरोंचा वन विभागाचे उपवनसंरक्षक तुषार चव्हाण यांनी दिली आहे.