गडचिराेली जिल्ह्यात पहिल्यांदाच आढळला दुर्मीळ अर्धअल्बिनो डुरक्या घोणस; वनविभागाने केली नाेंद
By गेापाल लाजुरकर | Published: June 25, 2023 08:20 PM2023-06-25T20:20:54+5:302023-06-25T20:21:12+5:30
जिल्ह्यात पहिल्यांदाच दुर्मीळ अर्ध अल्बिनाे डुरक्या घाेणस सापाची नाेंद वनविभागात झाली.
गडचिराेली : अर्ध अल्बिनाे प्रकारात साप तसे दुर्मीळच आहेत. त्यातही डुरक्या घाेणस प्रजातीत हा प्रकार अद्याप गडचिराेली जिल्ह्यात आढळलेला नाही. परंतु आरमाेरी येथे शनिवार २४ जून राेजी हा साप आढळून आला. जिल्ह्यात पहिल्यांदाच दुर्मीळ अर्ध अल्बिनाे डुरक्या घाेणस सापाची नाेंद वनविभागात झाली.
आरमोरी येथील नितीन गोंदोळे यांच्या घरी साप असल्याची माहिती येथील सर्प अभ्यासक देवानंद दुमाने यांना शनिवारी रात्री ७:३० वाजताच्या दरम्यान फोनद्वारे मिळाली. त्यानुसार सर्पमित्र देवानंद दुमाने व त्यांची टीम गोंदोळे यांच्या घरी पोहाेचली. दुमाने यांनी सापाचे निरीक्षण केले असता सदर साप दुर्मीळ अर्ध अल्बिनो डुरक्या घोणस असल्याचे दिसून आले. सापाला सुरक्षितरित्या पकडण्यात आले. अर्ध अल्बिनो डुरक्या घोणस सापाला पकडल्यानंतर या सापाची नोंद वनविभागात करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. यावेळी आरमोरी येथील वन्यजीव रक्षक देवानंद दुमाने, दीपक सोनकुसरे, करण गिरडकर, वसीम शेख, नितीन गोंदोळे उपस्थित होते.
सामान्य व अर्ध अल्बिनाेमध्ये फरक काय ?
सामान्य डुरक्या घोणस मातकट चाॅकलेटी रंगाचा असतो. त्यावर बदामी रंगाचे आडवे, तिडवे पट्टे असतात. त्याचे तोंड चापट, निमुळते व शेपटी आखूड असते. शेपटीवर खवले असतात. शरीर जाड, डोळे बारीक, व बाहुली काळी असते. या दोन्ही प्रजातीत साम्यता असली तरी अर्ध अल्बिनाे डुरक्या घाेणस हा साप ‘ल्यूसिस्टिक स्नेक’ म्हणून ओळखला जातो. हा साप बिनविषारी असून त्याचा रंग पांढरा किंवा लालसर असताे, तर डोळे सामान्य सापाप्रमानेच काळे असतात. तोंडाचा भाग काळा असतो. शरीरावरील छटा स्पष्ट दिसून येत नाहीत.