सिरोंचात आढळला दुर्मीळ पांढरा साप, सुरक्षित सोडला जंगलात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 03:05 PM2023-03-23T15:05:28+5:302023-03-23T15:08:32+5:30
अल्बिनो कोब्रा : मिलमधील एका खोलीत मजुरांना दिसला
कौसर खान
सिरोंचा (जि. गडचिरोली) : तब्बल ७० टक्के जंगलक्षेत्र असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात वन्यप्राण्यांसह सर्पांच्याही विविध जाती आढळतात, पण २१ मार्च रोजी पहिल्यांदाच दुर्मीळ अल्बिनो कोब्रा हा पांढरा विषारी साप आढळून आला. त्याला सुरक्षितरीत्या जंगलात सोडण्यात आले.
सिरोंचा येथे एक राइस मिल आहे. तेथे नित्याप्रमाणे मजूर काम करत होते. या मिलमधील एका खोलीत मजुरांना पांढऱ्या रंगाचा दुर्मीळ साप आढळून आला. या सापाला पाहून मजूर भयभीत झाले. त्यानंतर त्यांनी त्यास मारून टाकण्याचा प्लॅन केला ; परंतु एका मजुराने परिचयातील सर्पमित्र व सिरोंचा ठाण्याचे हवालदार नईम शेख यांना पाचारण करून त्या सापाला जीवदान देऊ, असे सांगितले. इतर मजुरांनीही यास होकार दिला. त्यानंतर तातडीने नईम शेख यांना पाचारण केले. त्यांनी आपल्या कौशल्याने हा साप पकडला व सिरोंचा परिसरातील डोंगरात सोडून दिला.
काय आहे पांढऱ्या सापाचे वैशिष्ट्य
अल्बिनो कोब्रा नावाने ओळखला जाणारा हा साप कोब्रा प्रजातीतील आहे. सापाची वाढ कमी असते. मात्र, हा साप पूर्ण वाढलेला होता. त्वचेचा होणाऱ्या अल्बिनझम या आजारामुळे त्वचा पांढरी होते. फणा काढणारा हा साप विषारी असतो.
अल्बिनो कोब्रा गडचिरोली जिल्ह्यात पहिल्यांदाच आढळला आहे. हा साप दुर्मीळ आहे. यंदा सिरोंचा परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे हा साप पाण्यासोबत वाहून आल्याचा अंदाज आहे. सापाला जंगलात सोडले आहे.
- नईम शेख, सर्पमित्र सिरोंचा