आरोग्य केंद्रांच्या कार्यक्षेत्रातही होणार रॅटची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:42 AM2021-03-01T04:42:56+5:302021-03-01T04:42:56+5:30
गडचिरोली जिल्ह्यात मागील ८ ते १० दिवसांपासून कोराेनाबाधित रुग्णांची झपाट्याने वाढ होत आहे. जिल्ह्याला दैनंदिन २ हजार ५०० ...
गडचिरोली जिल्ह्यात मागील ८ ते १० दिवसांपासून कोराेनाबाधित रुग्णांची झपाट्याने वाढ होत आहे. जिल्ह्याला दैनंदिन २ हजार ५०० जणांची तपासणी वाढविण्याच्या दृष्टीने प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर आरोग्य सेवक, समुदाय आरोग्य अधिकारी यांचे कमीतकमी दोन पथक तयार करावे, प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यक्षेत्रात कोविडची तपासणी करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत.
त्याआनुषंगाने प्राथमिक आरोग्य कार्यक्षेत्रातील सुपर स्प्रेडर जसे दुकानदार, खानावळ, प्रवासी वाहतूक करणारे, प्रतिबंधक क्षेत्र, खासगी व शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालय, कार्यक्षेत्रातील गरोदर मातांची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याआनुषंगाने संबंधित उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक व तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी आपल्या तालुक्यातील वैद्यकीय अधीक्षक यांच्याशी समन्वय साधून तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र निहाय रॅट किट्स व पिपिई किट उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. कुंमरे यांनी दिली आहे.
स्थानिक गावपातळीवर कोविड-१९च्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर समिती स्थापन करून या माध्यमातून मास्कचा वापर करणे अन्यथा दंडात्मक कारवाई तसेच शारीरिक दुरीकरण पाळणे, सॅनिटाइजरचा वापर करणे, लग्न समारोह, अंतविधी, यात्रा, उत्सव, आठवडी बाजाराचे ठिकाण यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोविड समित्या स्थापन करण्यात येत आहे. कोविडच्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी व समितीस दिलेल्या अधिकारानुसार दंड आकारून वसुली करताना कुठलाही धोका होणार नाही, यास्तव प्रत्येक ग्रामपंचायतीला सुरक्षारक्षक पुरवण्याची मागणी तालुक्यातील ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे.