वीज चाेरीचे प्रमाण वाढतीवरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:34 AM2021-03-08T04:34:08+5:302021-03-08T04:34:08+5:30
नाल्यांचा उपसा नाही, डास वाढले एटापल्ली : शहरातील बहुतांश वाॅर्डातील नाल्या कचरा व सांडपाण्याने तुडुंब भरल्या आहेत. ओपनस्पेसही कचऱ्याचे ...
नाल्यांचा उपसा नाही, डास वाढले
एटापल्ली : शहरातील बहुतांश वाॅर्डातील नाल्या कचरा व सांडपाण्याने तुडुंब भरल्या आहेत. ओपनस्पेसही कचऱ्याचे केंद्र बनले आहे. परिणामी डास व कीटकांची उत्पत्ती होत आहे. आरोग्य धोक्यात आले आहे. नगर परिषदेने फवारणी करून डास व कीटकांचा बंदोबस्त करण्याची मागणी आहे.
शासकीय दूध शीतकरण केंद्राचा अभाव
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात नागेपल्ली व कनेरी येथे राज्य शासनाचे दूध शीतकरण केंद्र आहे. मात्र, दुधाचे पुरेसे उत्पादन जिल्ह्यात नसल्याने हे शीतकरण केंद्र सध्या बंद आहे. नव्या सरकारने दुग्ध व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करून शीतकरण केंद्र सुरू करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
ग्रामीण भागातील स्मशानभूमींची दुरवस्था
कुरखेडा : जि. प. प्रशासनामार्फत दहन व दफनभूमी बांधण्याची योजना गेल्या काही वर्षांपासून हाती घेण्यात आली असली तालुक्यातील घाटी, गांगुली, मालदुगी परिसरातील अनेक गावातील जुन्या स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणचे दहनशेड मोडकळीस आले असून, स्मशानभूमीत जाण्यासाठी पक्का रस्तादेखील नाही.
मुलचेरात पाळीव डुकरांचा हैदोस वाढला
मुलचेरा : तालुका मुख्यालयी पाळीव डुकरांचा हैदोस निर्माण झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र, डुकरांचा बंदोबस्त करण्याकडे नगरपंचायतीचे दुर्लक्ष आहे. डुकरांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अनेक ठिकाणी डुकरांकडून घाणही निर्माण केली जात असल्याने नागरिक त्रस्त आहेत. सातत्याने मागणी करूनही प्रशासनाने स्वच्छतेबाबत माेहीम हाती घेतली नाही.
कव्हरेजअभावी माेबाईलधारक त्रस्त
अहेरी : आलापल्ली-सिरोंचा मुख्य मार्गावरील गोलाकर्जी गावात कव्हरेज नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. गोलाकर्जी रस्त्यावर असल्याने राजाराम, खांदला, पत्तीगाव, चिरेपल्ली, छल्लेवाडा, मरनेली, आदी गावातील नागरिकांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क होत नाही. टाॅवर व भूमिगत केबल लाईनवर लाखाे रुपये खर्च करूनही सेवेत सुधारणा झाली नाही.
नळाला तोट्या नसल्याने पाण्याचा अपव्यय
गडचिरोली : शहरातील बहुतांश नळांना नागरिकांनी तोट्या लावल्या नाहीत. त्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. येथील अनेक वॉर्डांतील नागरिकांच्या घरातील नळाच्या तोट्या निकामी झाल्या आहेत.
शासकीय निवासस्थानी राहणे सक्तीचे करा
अहेरी : शासनाने लाखो रुपये खर्च करून येथे कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधून घेतली. मात्र, शासकीय कर्मचारी या निवासस्थानांना ‘खो’ देत असल्याने कर्मचाऱ्यांना देखभालीअभावी ही निवासस्थाने ओसाड झाली आहेत.
खुल्या जागेत कचऱ्याचे साम्राज्य
गडचिरोली : गडचिरोली नगरपालिका क्षेत्रात अनेक वार्डांमध्ये ओपन स्पेस आहेत. मात्र, काही मोजक्याच ओपन स्पेसला संरक्षण भिंत उभारण्यात आली आहे. अनेक ठिकाणच्या ओपन स्पेसला संरक्षण भिंत नाही. तसेच या ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य दिसून येते. न. प. प्रशासनाने शहरातील सर्वच ओपन स्पेसचा विकास करावा.
अनुदानात वाढ करण्याची मागणी
कुरखेडा : निराधारांना शासनाकडून प्रतिमाह अत्यल्प अनुदान दिले जाते. हे अनुदान अत्यंत कमी आहे. महागाईमुळे प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे अनुदानात वाढ करण्यात यावी, अशी मागणी अनेकदा करण्यात येऊनही शासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. महागाई वाढत असल्याने अनुदान तुटपुंजे ठरत आहे.
रस्त्याच्या बाजूला वाहने लावणाऱ्यांवर कारवाई करा
गडचिरोली : गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकात अगदी रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहने पार्क केली जातात. या वाहनांवर कारवाई होत नसल्याने वाहने रस्त्यावर लावण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. वाहनांवर कारवाई करण्याची मागणी आहे.
ग्रामीण भागात पेट्रोलची अवैध विक्री
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण व दुर्गम भागात जादा दराने पेट्रोलची विक्री गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. खेड्यातील काही किराणा दुकानदार विक्रीसाठी शहरातील पेट्रोलपंपावरून ठोक स्वरूपात पेट्रोल नेऊन ठेवतात. गरजू दुचाकीस्वारांकडून एका लिटरमागे २० ते ३० रुपये जादा उकळतात.
अतिक्रमणाच्या विळख्यात आरमाेरी
आरमोरी : शहरातील अंतर्गत रस्त्यांवर, तसेच खुल्या जागांवर नागरिकांनी अतिक्रमण करून पक्के बांधकाम बांधले आहे. रस्त्यांवरील अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद झाले असून, अपघातांची संख्या वाढली आहे. मात्र, अतिक्रमण काढण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
चामोर्शी तालुक्यातही गावांना रस्त्याची प्रतीक्षा
चामोर्शी : तालुक्यातील अनेक गावांसाठी रस्त्याचे बांधकाम करण्यात आले नसल्याने नागरिकांना पायवाटेनेच ये-जा करावी लागत आहे. तालुक्यातील वेंगनूर येथे अद्यापही शासनाच्या योजना पोहोचलेल्या नाहीत. प्रशासनाने याची दखल घ्यावी. पाणंद रस्त्याचेही खडीकरण न झाल्याने शेतकऱ्यांना पावसाळ्यात त्रास हाेताे.
खरपुंडी मार्गाचे रुंदीकरण करण्याची मागणी
गडचिरोली : खरपुंडी मार्गाचे रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी केली आहे. मागील अनेक दिवसांपासून या मार्गाचे रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी होत असली तरी याकडे दुर्लक्ष होत आहे. या मार्गावरून जेप्रा, दिभना, अमिर्झा, चांभार्डा, आंबेशिवणी, भिकारमौशी, राजगाटा, उसेगाव, आदी गावांतील शेकडो नागरिक ये-जा करतात. मार्ग अरुंद असल्याने वाहतुकीस अडथळा होतो.
जिल्ह्यात गोदरीमुक्त अभियानाचा फज्जा
एटापल्ली : अहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली, आदी दुर्गम तालुक्यातील अनेक गावांमध्ये वैयक्तिक शौचालये फारच कमी प्रमाणात आहेत. जिल्ह्यात १०० टक्के शौचालय असणारा एकही गाव नाही. यामुळे गोदरीमुक्त अभियानाचा फज्जा उडाला आहे. त्यामुळे आजारात वाढ होत आहे. ग्रामीण भागातील नागरिक रस्त्याच्या मुख्य मार्गावरच उघड्यावर शौचास बसत आहेत.
रेपनपल्ली-कमलापूर रस्ता उखडलेलाच
एटापल्ली : कमलापूर ते रेपनपल्ली या तीन कि.मी.च्या रस्त्यावरील डांबर जागोजागी उखडले आहे. आतील दगड व गिट्टी बाहेर आली आहे. तसेच या रस्त्यावर असलेले पूलसुद्धा जीर्ण अवस्थेत आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने आराखडा तयार करून रेपनपल्ली-कमलापूर मार्गाची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
३३ केव्ही उपकेंद्राचे काम थंडबस्त्यात
आलापल्ली : वन कायद्यामुळे दुर्गम व अतिदुर्गम भागात महावितरणाला ३३ व ६६ केव्ही वीज उपकेंद्र उभे करण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही. ही जागा घेण्यासाठी तेवढी एमपीव्ही रक्कम भरावी लागते. राज्य सरकार ती भरण्यास तयार नसल्याने काम रखडले आहे.
मातीच्या बांधाचे प्रस्ताव धूळ खात
आलापल्ली : वनविभागातर्फे दोन वर्षांपूर्वी जंगलातील सहा स्थानांवर मातीचे बांध बांधण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला होता. परंतु, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा प्रस्ताव अजूनही धूळ खात पडला आहे. बंधाऱ्यांची निर्मिती झाल्यास जलसाठ्यात वाढ होऊन पातळीत सुधारणा होऊ शकते.
तलाठ्यांचे अपडाऊन वाढले
चामोर्शी : तलाठ्यांना मुख्यालयी राहण्याची सक्ती करावी, अशी मागणी दुर्गम भागातील नागरिकांनी केली आहे. जिल्हाभरातील तलाठी सजाच्या ठिकाणी ये-जा करतात. त्यामुळे शेतकरी व विद्यार्थ्यांची दाखल्यासाठी पायपीट होत आहे. सध्या तलाठ्यांनी रहिवासी व जातीचे दाखले देणे बंद केले आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळे तलाठ्यांचे अपडाऊन वाढले.
अहेरी बाजार परिसरात स्वच्छतेची ऐसीतैसी
अहेरी : शहरातील बाजार परिसरात अस्वच्छता पसरली आहे. नाल्यांची सफाई अनेक दिवसांपासून करण्यात आलेली नाही. त्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. नगर पंचायत प्रशासनाने संपूर्ण वॉर्डातील नाल्यांची सफाई करावी. घाण परिसराचीही स्वच्छता करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सातत्याने मागणी करूनही अहेरी न.पं.ने स्वच्छतेबाबत ठाेस नियाेजन केले नाही.
शहरातील नाल्या गाळाने बुजल्या
गडचिरोली : शहरात अनेक नाल्यांच्या बाजूला असलेल्या रस्त्यांची वारंवार दुरुस्ती झाल्याने रस्ते उंच आणि नाल्या खाली गेल्या आहेत. शिवाय शहरातील रस्ते अरुंद असल्याने अनेक वाहनेही नालीत पडून अपघात होण्याची शक्यता असते. या नाल्यांवर कोणतेच आच्छादन नसल्यानेही किरकोळ अपघात घडतात.
सिरोंचा तालुक्यातील बस थांब्यांची दुर्दशा
सिरोंचा : अहेरी ते गडचिरोली आगारातून सिरोंचा तालुक्याच्या ग्रामीण भागात बस सोडल्या जातात. प्रवाशांच्या सोयीसाठी प्रवासी निवारे बांधण्यात आले आहेत. मात्र, या निवाऱ्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाली असल्याने त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. बऱ्याच प्रवासी निवाऱ्यांचे टिनपत्रे वादळाने उडाली आहेत. भिंती पिचकाऱ्यांनी रंगल्या असून, घाणीचे साम्राज्य आहे.
अहेरी शहरातील अतिक्रमण कायमच
अहेरी : शहरात रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. प्रशासनाने सदर अतिक्रमण तत्काळ काढावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. यापूर्वीही अनेकदा मागणी करण्यात आली. मात्र, दुर्लक्षच झाले आहे. सातत्याने मागणी करूनही प्रशासनाकडून अतिक्रमणधारकांवर कारवाई होताना दिसून येत नाही.
अभयारण्यातील गावांचे पुनर्वसन केव्हा हाेणार
आष्टी : चामोर्शी तालुक्यातील आष्टी परिसरातील चपराळा अभयारण्यांतर्गत चपराळा व इतर लहान-मोठी चार ते पाच गावे येतात. या अभयारण्यातील पशूंमुळे गावकऱ्यांना धोका आहे. आजपर्यंत वन्यपशूंचे अनेक हल्ले नागरिकांवर झाले आहेत. त्यामुळे या गावांचे पुनर्वसन करण्याची मागणी होत आहे.
ग्रामीण भागातील हगणदारीमुक्तीवर प्रश्नचिन्ह
विसोरा : बहुतांश नागरिकांकडे शौचालय आहे. मात्र, ग्रामीण भागातील नागरिक शौचालयाचा वापरच करीत नाही. परिणामी शौचालय निकामी झाले आहेत. शौचालयाचा वापर न झाल्याने हगणदारीमुक्त गाव निर्माण करणे अडचणीचे झाले आहे. ग्रामीण भागातील अनेक नागरिक लाेटा घेऊन रस्त्याच्या कडेला जातात.
अल्पवयीन चालकांवर कारवाई नाही
आरमोरी : शहरातून मोठ्या प्रमाणात भरधाव वेगाने वाहने चालवली जात आहेत. मात्र, याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे अपघातही घडलेले असून, या भरधाव वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. परंतु या मागणीकडे दुर्लक्ष हाेत असल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे.
ग्रामीण भागातील स्मशानभूमींची दुरवस्था
कुरखेडा : जि.प. प्रशासनामार्फत दहन व दफनभूमी बांधण्याची योजना गेल्या काही वर्षांपासून हाती घेण्यात आली असली तरी अनेक गावांतील जुन्या स्मशानभूमींची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणचे दहन शेड मोडकळीस आले असून, स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्तादेखील नाही. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी अनेक अडचणी येतात. त्यामुळे स्मशानभूमीचा विकास करावा, अशी मागणी हाेत आहे.
मुद्रांक विक्रीत नागरिकांची लूट
गडचिरोली : विविध कामांसाठी लागणाऱ्या मुद्रांकांची विक्री शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक दराने सुरू आहे. १०० रुपये किमतीचे मुद्रांक ११०, ५०० रुपयांचे मुद्रांक ५१० रुपयांना विकले जात आहेत.
डिजिटल बॅनरमुळे पेंटर झाले बेराेजगार
सिरोंचा : संगणकाद्वारे विविध मल्टी कलरचे आकर्षक बॅनर मशीनद्वारे बनविण्यात येतात. ते कमी किमतीत कमी वेळात उपलब्ध होतात. त्यामुळे विविध रंगांचे डब्बे व ब्रश घेऊन दिसणारे पेंटर आता दिसेनासे झाले आहेत.
येवली येथे जलद बसला थांबा द्या
गडचिरोली : येथून जवळच असलेल्या येवली येथे जलद बसला थांबा आहे. मात्र, गडचिरोली आगाराच्या बसगाड्यांव्यतिरिक्त इतर आगारांच्या जलद बसगाड्या येथे थांबत नाहीत. त्यामुळे नागरिकांना गडचिरोली आगारात बसगाडी बदलावी लागत आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी येथे जलद बसथांबा देण्याची मागणी होत आहे.
लोंबकळणाऱ्या तारांमुळे वाढला धोका
धानोरा : शहरातील मुख्य बाजारपेठ तसेच इतरही वॉर्डांमध्ये विजेच्या तारा लोंबकळत आहेत. याबाबत स्थानिक नागरिकांनी महावितरणकडे तक्रारही केली आहे. मात्र, महावितरण कंपनीचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत.
कलेक्टर कॉलनीत सांडपाण्याची दुर्गंधी
गडचिरोली : शासकीय कर्मचाऱ्यांची वसाहत समजल्या जाणाऱ्या कॉम्प्लेक्स परिसरातील कलेक्टर कॉलनीतील ड्रेनेज लाईन फुटली आहे. त्यामुळे सांडपाण्याची दुर्गंधी येत आहे. सातत्याने मागणी करूनही पालिका प्रशासनाचे समस्यांकडे दुर्लक्ष आहे.
सट्टापट्टीसाठी इंटरनेटचा वापर वाढला
कुरखेडा : तालुक्यासह जिल्हाभरातील शहरी भागात सट्टापट्टीचे नंबर पाहण्यासाठी मोबाईलद्वारे इंटरनेटचा वापर प्रचंड वाढला आहे. अनेक लोक भ्रमणध्वनीवर इंटरनेटद्वारे सट्टापट्टीचे नंबर शोधताना दिसून येतात. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
गोगाव-पिपरटोला मार्गाची दुरूस्ती करा
गडचिरोली : तालुक्यातील गोगाव - पिपरटोला या मार्गाची अनेक दिवसांपासून दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. सदर मार्गाची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
आलापल्ली येथे गतिरोधक निर्माण करा
आलापल्ली : येथील नागमाता मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु या मार्गाने भरधाव वाहनांचे आवागमन असते. येथे गतिरोधक उभारावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या मार्गावरून दुचाकी, चारचाकी वाहनांसह अवजड वाहनांचेही आवागमन असते.
सीमावर्ती भागात गुटखा विक्री सुरूच
अहेरी : जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात गुटखा विक्री सुरूच असल्याचे उघडकीस आले आहे. जिल्ह्याला लागून असलेल्या छत्तीसगड, आंध्रप्रदेश या राज्यातून अवैध गुटखा विक्रीस आणला जात आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
आलापल्ली येथे बंधाऱ्याचे बांधकाम करा
आलापल्ली : परिसरातील गावांमध्ये कोल्हापुरी बंधाऱ्याचे बांधकाम करावे, अशी मागणी गावातील नागरिकांकडून होत आहे. गावात अल्प हातपंप सुरू असल्याने येथे नव्याने हातपंपही निर्माण करावेत, अशी मागणी आहे. या भागात सिंचन सुविधा ताेकड्या असल्याने याचा परिणाम दाेन्ही हंगामातील विविध पिकांवर हाेत आहे.
खुटगाव येथील प्रवासी निवाऱ्याची दुरवस्था
धानोरा : तालुक्यातील खुटगाव येथील प्रवासी निवाऱ्याच्या देखभाल दुरूस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने सध्या प्रवासी निवारा दुरवस्थेत आहे. निर्मितीपासून प्रवासी निवाऱ्याची अद्याप दुरूस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे सदर प्रवासी निवाऱ्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून हाेत आहे.