जिल्ह्यातील रेशन दुकानदार संपावर ठाम; कमिशनमध्ये वाढ आणि मार्जिन मध्ये देखील सुधारणा करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2024 02:52 PM2024-10-09T14:52:13+5:302024-10-09T14:58:15+5:30
निवेदन: प्रति क्विंटल ३०० रुपये कमिशन द्या
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आजच्या महागाई निर्देशांकानुसार राज्यातील सर्व रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिन मध्ये किमान ३०० रुपये प्रति क्विंटल इतकी वाढ करण्यात यावी, तसेच रास्त भाव दुकान मार्जिन करिता महागाई निर्देशांक लागू करण्यात येऊन प्रतिवर्षी महागाई निर्देशांकातील बदलानुसार रास्त भाव दुकान मार्जिन मध्ये देखील आवश्यक सुधारणा करण्यात यावी, या मुख्य मागणीसाठी राज्यभरातील दुकानदार संपावर जाणार आहेत. त्याला जिल्ह्यातील रेशन दुकानदारांना पाठिंबा दर्शवला आहे. तसे निवेदन तहसीलदारांना सादर करण्यात आले.
केंद्र शासनाद्वारे सन २०२२ मध्ये राज्य सरकारांना सुनिश्चित आर्थिक सहाय्य (सुधारणा) नियम, २०२२ नुसार सुधारित केलेल्या २० रुपये प्रति क्विंटल या मार्जिन वाढीनुसार तफावतीची रक्कम पूर्वलक्षी प्रभावाने देण्यात यावी. सण व उत्सवाच्या काळात राज्य शासनामार्फत देण्यात येणारा 'आनंदाचा शिधा' या शिधा जिन्नस संचांच्या विक्रीकरिता प्रति सिधा जिन्नस संच १५ रुपये इतके मार्जिन देण्यात यावे. राज्यामध्ये प्रचलित "गाव तिथे दुकान" धोरणानुसार एक हजार पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावातील दुकानदाराला एक हजार लोकसंख्येएवढेच मार्जिन देण्यात यावे. राज्यातील सर्व रास्त भाव दुकानांना वाणिज्य ऐवजी घरगुती दराने वीजपुरवठा करण्यात यावा आदी मागण्यांसाठी संप पुकारला जाणार आहे. गडचिरोली तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार चंदू प्रधान यांनी निवेदन स्वीकारले. निवदेन देताना बी. यू, नैताम, बाळा नैताम, सरिता टेंभूर्णे, अनिल भांडेकर, मोहन पाल, काशीनाथ जेंगठे उपस्थित होते.
खर्चासाठी पैसे द्या
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्ता करामध्ये सवलत मिळावी. रास्त भाव दुकानाचे भाडे वीज बिल, इंटरनेट खर्च, स्टेशनरी खर्च तसेच मापाडी पगार यासारख्या इतर अनुषंगिक बाबींसाठी ग्रामीण व शहरी भागाकरिता अनुक्रमे प्रति रास्त भाव दुकान प्रति महिना किमान तीन ते सात हजार रुपये देण्यात यावे, अशी मागणी आहे