रावणवाडीवासीय विकासाच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:38 AM2021-04-09T04:38:33+5:302021-04-09T04:38:33+5:30
देसाईगंज : तालुका मुख्यालयापासून अवघ्या १८ किलोमीटर अंतरावर असलेल्या व बोळधा गट ग्रामपंचायत अंतर्गत येणारे रावणवाडी टोली हे ...
देसाईगंज : तालुका मुख्यालयापासून अवघ्या १८ किलोमीटर अंतरावर असलेल्या व बोळधा गट ग्रामपंचायत अंतर्गत येणारे रावणवाडी टोली हे गाव स्वातंत्र्याच्या ७१ वर्षानंतरही विकासापासून दूर आहे.
तालुक्यात संपूर्ण आदिवासी बांधव वास्तव्यास असलेल्या या गावात माडिया गोंड जातीचे २७५ लोक वास्तव्यास आहेत. गावात एकूण २९ कुटुंब आहेत. विशेष म्हणजे, तत्कालीन आमदार इंदूताई नाकाडे यांच्या व्यतिरिक्त आजपर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधी अथवा अधिकाऱ्यांनी गावाला भेट दिली नाही. १९९२ मध्ये गावाला मुख्य मार्गाशी जोडण्याकरिता कच्च्या रस्त्याचे खडीकरण करण्यात आले. तेव्हापासून आजतागायत मुख्य मार्गाशी रस्ता जोडण्याचे व त्यावर डांबरीकरणाचे काम झाले नाही.
या गावाने जंगलाचे संरक्षण व संवर्धन करून उपलब्ध जंगलाची व्याप्ती कायम ठेवली असून, संपूर्ण गाव धूरमुक्त झाले आहे. गावालगत असलेल्या २० हेक्टरमधील तलावामुळे सिंचनाची सोय झाली आहे. या गावाने आदिवासी पारंपरिक रेला नृत्याचे जतन करून आपली संस्कृती जोपासण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. देसाईगंज येथे होणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये येथील नागरिक सहभाग घेतात. गावाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासकीय, प्रशासकीय स्तरावरून यथायोग्य प्रयत्न केल्या जात नाहीत. त्यामुळे या गावाचा विकास रखडला आहे. हे गाव आदिवासी असतानाही विकासापासून वंचित आहे.
बाॅक्स ......
आरोग्य, शैक्षणिक सुविधेचा अभाव
जंगलव्याप्त या गावात एका अंगणवाडी व्यतिरिक्त शिक्षणाची कुठलीही सोय उपलब्ध नाही. येथील विद्यार्थ्यांना सहा किलोमीटर अंतरावरील कोरेगाव येथे शिक्षण घेण्याकरिता वन्य प्राण्यांचा धोका पत्करून जावे लागते. गावात शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. संपूर्ण आदिवासी गाव असूनही या गावाचा समावेश पेसा क्षेत्रात नाही. याशिवाय गावातील एकाही नागरिकाला घरकुल योजनेचा लाभ मिळाला नाही. अनेक कुटुंब पडक्या कौलारू घरातच वास्तव्य करीत आहेत. येथील नागरिकांना कोरेगाव येथील स्वस्त धान्य दुकानातून धान्य आणावे लागते. याशिवाय आरोग्य सेवेसाठी सहा किमीची पायपीट करून कोरेगावला जावे लागते.