रवींद्रबाबा चौकशीला आलेच नाही
By admin | Published: March 12, 2016 01:32 AM2016-03-12T01:32:56+5:302016-03-12T01:32:56+5:30
रविवारी अहेरी तालुक्यातील दोडेपल्ली येथील चितळ शिकार प्रकरणात मुख्य संशयित असलेले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ...
चितळ शिकार प्रकरण : चार आरोपींना २४ मार्चपर्यंत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
अहेरी : रविवारी अहेरी तालुक्यातील दोडेपल्ली येथील चितळ शिकार प्रकरणात मुख्य संशयित असलेले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व भाजपचे नेते रवींद्रबाबा आत्राम यांना चौकशीसाठी ११ मार्च रोजी हजर राहण्याचे आदेश उपविभागीय वनाधिकारी रवी अग्रवाल यांनी दिले होते. मात्र रवींद्रबाबा आत्राम शुक्रवारी दिवसभर वन विभागाकडे चौकशीसाठी फिरकले नाही. ते फरार असून या प्रकरणात पहिल्याच दिवशी अटक करण्यात आलेले आनंदराव लचमा तोरेम (३२) रा. दोडेपल्ली व बुधवारी, गुरूवारी वन विभागाने चितळाचे मांस खरेदी केले म्हणून चौकशीसाठी ताब्यात घेऊन अटक केलेले दीपक सडमेक (३०), दिवाकर सडमेक (३२) रा. दोडेपल्ली, नारायण मडावी (४०) रा. रामपूर व किंटू पेंदाम (२८) रा. दोडेपल्ली या चौघांना शुक्रवारी अहेरी न्यायालयात सायंकाळी ५ वाजता हजर केले. न्यायालयाने या पाच आरोपींना २४ मार्चपर्यंत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. रवींद्रबाबा आत्राम यांच्या घरी मंगळवारी धाड घालण्यात आली. या धाडीत सात बंदुका व वन्य प्राण्यांची शिंगे, मांसाचे तुकडे वन विभागाने जप्त केले आहेत. त्यामुळे त्यांना अटक करण्यासाठी आता वन विभागाला शिकस्त करावी लागणार आहे. एकूणच राजकीय गोट्यात या प्रकरणाची जोरदार चर्चा असून आत्राम परिवार अडचणीत आला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
चार दिवसानंतर तपास अधिकारी आलापल्लीत दाखल
आलापल्ली : अहेरी तालुक्याच्या दोडेपल्ली येथे रविवारी चितळ शिकार प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणात पाच आरोपी अटक करण्यात आले आहे. मात्र या प्रकरणाचे मुख्य सूत्रधार जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रवींद्रबाबा आत्राम पसार आहेत. या प्रकरणाचे तपास अधिकारी उपविभागीय वनाधिकारी रवी अग्रवाल आहेत. घटना घडल्यापासून सलग तीन दिवस ते बैठकांमुळे आलापल्ली मुख्यालयात नव्हते. शुक्रवारी ते येथे परतले. त्यामुळे मागील तीन दिवसांपासून मंदावलेली तपासाची गती आता पुन्हा वेग पकडण्याची शक्यता असून वन विभागाच्या या थंड तपासामुळे फरार असणाऱ्या आरोपींना नव्या पळवाटा मिळू शकतात, असा जाणकारांचा अंदाज आहे. वन्य प्राण्यांच्या शिकारीबाबतचे कायदे अतिशय कडक असून या कायद्यात नमूद बाबीचा विचार करता, सहायक वन संरक्षक दर्जापेक्षा कमी नसलेला अधिकारी या प्रकरणाचा तपास करू शकत नाही. त्यामुळेच या प्रकरणाचा सर्व तपास सहायक वनसंरक्षक आर. एम. अग्रवाल यांच्याकडे देण्यात आला होता. हे मंगळवारपासून सलग तीन दिवस कार्यालयीन कामाच्या व्यस्ततेमुळे बाहेरगावी होते. त्यामुळे या चितळ शिकार प्रकरणाच्या तपासाला फारशी गती मिळू शकली नाही. आलापल्ली व अहेरीचे वन परिक्षेत्राधिकारी आपल्या स्तरावर काय तो तपास करीत होते. मात्र जे या प्रकरणाचे चौकशी अधिकारी आहे, ते आऊट आॅफ आलापल्ली असल्याने फरार आरोपी यातून आपली सुटका कशी करून घेता येईल, याचे आराखडे बांधत सुटकेचे अनेक मार्ग शोधत असल्याचे बोलले जात आहे. शुक्रवारी अग्रवाल हे आलापल्लीत दाखल झाले असून आता तरी तपासाला गती मिळेल, अशी आशा आहे. तपासातील या थंड गतीबाबत आलापल्लीचे उपवनसंरक्षक हेमंतकुमार मिना यांना विचारणा केली असता, या प्रकरणाचे चौकशी अधिकारी कार्यालयीन कामासाठी बाहेर गेले होते. दोन वन परिक्षेत्राधिकारी पाहत आहेत. मी ही या प्रकरणाची माहिती घेत आहे, असे त्यांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)