दोन सभापतींची फेरनिवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 12:45 AM2017-12-03T00:45:09+5:302017-12-03T00:45:33+5:30
जिल्ह्यातील नगर पंचायतींच्या विषय समिती व स्थायी समितीची निवडणूक प्रक्रिया शनिवारी पार पडली. यात काही सदस्यांची फेर निवड तर काही सदस्यांची नव्याने निवड करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा/भामरागड : जिल्ह्यातील नगर पंचायतींच्या विषय समिती व स्थायी समितीची निवडणूक प्रक्रिया शनिवारी पार पडली. यात काही सदस्यांची फेर निवड तर काही सदस्यांची नव्याने निवड करण्यात आली.
सिरोंचा नगर पंचायतीत विषय समिती सभापती पदाची निवडणूक शनिवारी घेण्यात आली. बांधकाम समिती सभापतीपदी सीमा रामस्वामी मासर्ला, पाणीपुरवठा व जलनि:सारण सभापतीपदी तोकला विजयकुमार तुलसीराम यांची फेरनिवड करण्यात आली. तर महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी वनिता रालबंडीवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. विशेष म्हणजे, तिन्ही पदाकरिता अनुक्रमे एकेक अर्ज प्राप्त झाले होते. दोन सभापती पद भाजपकडे तर एक सभापतीपद राष्टÑवादी काँग्रेसकडे कायम आहे. दोन स्वीकृत सदस्य व १७ निर्वाचित सदस्य असे एकूण १९ सदस्य संख्या नगर पंचायतीची आहे. विशेष समिती सभापती निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून अहेरीचे उपविभागीय अधिकारी सचिन ओंबासे, सहायक पीठासीन अधिकारी म्हणून मुख्याधिकारी भरत नंदनवार यांनी काम पाहिले. यावेळी तहसीलदार रमेश जसवंत उपस्थित होते.
भामरागड येथे स्थायी समितीचे गठन करण्यात आले. समितीच्या अध्यक्षपदी नगराध्यक्ष राजू वड्डे तर सदस्यपदी बांधकाम सभापती हरिदास रापेल्लीवार, पाणीपुरवठा व जलनि:सारण समिती सभापती शंकर आत्राम, आरोग्य व स्वच्छता सभापतीपदी शारदा कंबगौणीवार, महिला व बालकल्याण सभापती कविता सिडाम, महिला व बालकल्याण उपसभापती बेबी पोरतेट यांची निवड करण्यात आली. निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार कैलास अंडिल, सहायक पीठासीन अधिकारी म्हणून मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण यांनी काम पाहिले. याप्रसंगी अधिकारी हजर होते.