पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले विद्यार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 12:09 AM2019-08-30T00:09:50+5:302019-08-30T00:10:13+5:30
गडचिरोली जिल्ह्यातील २५ ते ३० महाविद्यालयातील रासेयो स्वयंसेवकांनी महाविद्यालयाच्या परिसरातील गावांमध्ये फिरून पूरग्रस्तांसाठी कपडे, भांडी व इतर शैक्षणिक तसेच औषधासाठा सुद्धा गोळा केला. चंद्रपूर जिल्ह्यातील ३५ वर महाविद्यालयाच्या रासेया स्वयंसेवक व विद्यार्थ्यांनी पूरग्रस्तांसाठी विविध प्रकारचे साहित्य गोळा केले व हे साहित्य गोंडवाना विद्यापीठात अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राज्यातील कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यासह मुंबईच्या काही भागात अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली. परिणामी पूरग्रस्तांचे जीवन प्रभावित झाले. या पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठाने पुढाकार घेतला. दरम्यान ६७ महाविद्यालयाच्या सहकार्याने कपडे, भांडी, धान्य व इतर प्रकारचे मिळून जवळपास दोन ट्रक साहित्य विद्यापीठाच्या इमारतीत गोळा झाले आहे.
राष्टीय सेवा योजनेचे राज्य संपर्क अधिकारी डॉ.साळुंखे यांनी सोलापूर, सांगली व तत्सम भागातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी विद्यापीठाने प्रयत्न करावा, असे निर्देश १३ आॅगस्ट रोजी दिले. त्याच दिवशी विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित ज्या महाविद्यालयामध्ये राष्टीय सेवा योजनेचे पथक सक्रीय आहे, अशा महाविद्यालयांना पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सूचना करण्यात आली. त्यानंतर १४ आॅगस्टपासून महाविद्यालयस्तरावर तालुकास्तर व गावागावात पूरग्रस्तांसाठी साहित्य गोळा करण्याचे काम सुरू झाले. काही महाविद्यालयाच्या रासेयो स्वयंसेवकांनी मदतनिधी गोळा केला. या मदतनिधीतून महाविद्यालयाने पूरग्रस्तांसाठी आवश्यक साहित्याची खरेदी केली व हे साहित्य गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठात पोहोचविले.
गडचिरोली जिल्ह्यातील २५ ते ३० महाविद्यालयातील रासेयो स्वयंसेवकांनी महाविद्यालयाच्या परिसरातील गावांमध्ये फिरून पूरग्रस्तांसाठी कपडे, भांडी व इतर शैक्षणिक तसेच औषधासाठा सुद्धा गोळा केला. चंद्रपूर जिल्ह्यातील ३५ वर महाविद्यालयाच्या रासेया स्वयंसेवक व विद्यार्थ्यांनी पूरग्रस्तांसाठी विविध प्रकारचे साहित्य गोळा केले व हे साहित्य गोंडवाना विद्यापीठात अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले.
रासेयो स्वयसेवकांनी संकलित केलेल्या साहित्यांमध्ये चादर, ब्लकेट, दरी, बेडशिट, साडी, पॅन्ट, टी-शर्ट तसेच महिला व पुरूषांसाठी अंतरवस्त्र, सलवार सूट, धोती, सॅनेटरी पॅड आदींचा समावेश आहे.
याशिवाय गहू, तांदूळ, डाळ, पीठ, तिखट, हळद, मसाला पदार्थ एकूणच स्वयंपाकासाठी लागणाºया सर्व वस्तू जमा करण्यात आले आहेत. तसेच बिस्किट, साखर, तेल, साबून आदींसह इतर किराणा वस्तू, औषधसाठा आदींचा समावेश आहे. तसेच काही महाविद्यालयांनी स्कूल बॅग, वॉटर बॅग, बॉटल व इतर शैक्षणिक साहित्यही गोळा केले.
कोल्हापूर व भामरागडातील पूरग्रस्तांना पोहोचविणार साहित्य
महाविद्यालयस्तरावरून संकलित झालेले साहित्य सध्या वेगवेगळे करण्याचे काम विद्यापीठाच्या वतीने सुरू करण्यात आले आहे. हे साहित्य पूरग्रस्त कुटुंबासाठी पिशव्यांमध्ये व्यवस्थितरित्या पॅक केले जात आहे. जवळपास दोन ट्रक साहित्य विद्यापीठाकडे जमा झाले असून यातील अर्धे साहित्य गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड भागातील पूरग्रस्तांना पोहोचविण्यात येणार आहे. उर्वरित अर्धे साहित्य कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी देण्यात येणार आहे. लवकरच वाहनाने हे साहित्य रवाना होणार आहे.
साहित्याने सभागृह व व्हरांडा फुल्ल
गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील महाविद्यालयामार्फत प्राचार्यांच्या मार्गदर्शनात वाहनाने पूरग्रस्तांसाठी वितरित करावयाचे साहित्य गोंडवाना विद्यापीठाकडे सुपूर्द करण्यात आले. विद्यापीठातील सभागृह, वºहांडा तसेच कुलसचिवांच्या कक्षासमोरील भागात सर्व साहित्य ठेवण्यात आले आहे. सर्वत्र साहित्य दिसून येत आहे.