‘या’ कारणासाठी सापांचे संवर्धन आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 12:46 PM2020-06-15T12:46:17+5:302020-06-15T12:47:44+5:30
सापांविषयी असलेल्या अज्ञानामुळे असंख्य बिनविषारी सापांचा दरवर्षी बळी घेतला जातो. विषारी व बिनविषारी सापांना न मारता सुरक्षितस्थळी वस्तीपासून दूर ठेवल्यास जैैवविविधता कायम राहील.
गोपाल लाजूरकर
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : पावसाळा सुरू होताच जमिनीत दडून बसलेले सरपटणरे जीवजंतू बाहेर पडतात. दुसऱ्या प्राण्यांनी केलेल्या बिळात राहणारे सापसुद्धा बिळांतून बाहेर येतात. अनेकदा यातील विषारी प्राण्यांमुळे मानवी जीवाची हानी होते. त्यामुळे संपूर्ण पावसाळाभर खबरदारी घेणे आवश्यक आहे. सतर्क राहिल्यास विषारी प्राण्यांपासून विशेषत: सापांपासून होणारा दंश टाळता येतो. गडचिरोली जिल्ह्यात चार जातीचे विषारी साप आढळतात. मात्र, सापांविषयी असलेल्या अज्ञानामुळे असंख्य बिनविषारी सापांचा दरवर्षी बळी घेतला जातो. विषारी व बिनविषारी सापांना न मारता सुरक्षितस्थळी वस्तीपासून दूर ठेवल्यास जैैवविविधता कायम राहील.
बिनविषारी साप
विषारी, निमविषारी सापासह बिनविषारी सापसुद्धा जिल्ह्यात आढळतात. यात अजगर, धामण, तस्कर, गवत्या, दिवड, नानेटी, धूळनागीण, तस्कर, कवड्या, कुकरी, वाळा, डुरक्या घोणस, मांडूळ, रूका, ब्लॅक हेडेड (काळतोंड्या) आदींचा समावेश आहे. मांडूळ, गवत्या (दोन तोंडया) आदी दुर्मीळ साप आहेत. या सापांपासून धोका नसतानाही भीतीपोटी नागरिक त्यांना मारुन टाकतात. त्यामुळे या सापांबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे.
विषारी साप
गडचिरोली जिल्ह्यात विविध प्रजातींचे साप आढळून येतात. मात्र विषारी सापांमध्ये नाग, घोणस, मण्यार, फुरसे आदी सापांचा समावेश आहे. मण्यार सापाच्या दोन प्रजाती आहेत. यामध्ये काळा पांढºया गोलाकार पट्ट्यांचा व काळ्या-पिवळ्या पट्ट्यांचा पट्टेरी मण्यार आदींचा समावेश आहे. चार प्रजातीचे साप जहाल विषारी आहेत. विषारी सापाच्या दंशाने उपचाराअभावी जीवितहानी होऊ शकते.
असा करावा प्राथमिक उपचार
सर्पदंश झाल्यानंतर अनेकवेळा प्रथमोपचाराअभावी रूग्ण दगावतात. तर काही ठिकाणी औषधोपचाराअभावी रूग्ण दगावतो. अनेकदा भीतीनेही रुग्ण दगावल्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे सर्पदंश झालेल्या व्यक्तीला धीर देणे आवश्यक आहे.
सर्पदंश झालेल्या जागी प्रचंड वेदना होतात. साप विषारी असेल तर त्याच्या दोन दातांचा चावा लवकर लक्षात येतो. साप बिनविषारी असेल तर अर्धलंब वर्तुळाकार दातांच्या पंक्ती दिसतात. साप विषारी किंवा बिनविषारी असतानाही सदर व्यक्तीला वेदना होतात. अशावेळी घाबरून न जाता दंश झालेल्या ठिकाणापासून साधारण तीन ते चार इंच अंतरावर आवळपट्टी बांधावी.
घरात असलेली रिबिन, कपड्याची पट्टी, दोरी यापैकी कशाचाही त्यासाठी उपयोग करता येतो. घट्ट आवळून बांधल्यामुळे विष शरीरात पसरणार नाही आणि वैद्यकीय उपचारासाठी वेळ मिळतो.
सर्पदंश झाल्याचे लक्षात आल्यावर रुग्णाला धीर द्यावा . त्याला तोंडावाटे खाण्यासाठी काहीही देऊ नये. मोकळी हवा त्याच्यापर्यंत पोहोचेल याची दक्षता घ्यावी. काही वेळेत त्याला ग्लानी येण्याची शक्यता असल्याने एकटे न सोडता सोबत राहावे.
निसर्गाच्या अन्नसाखळीत सापाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. साप हा केवळ मानवमित्र नसून तो निसर्गमित्रही आहे. सापाचे मुख्य अन्न उंदीर आहे. याशिवाय पिकांवरील किटक, डासांच्या अळ््या, घुशी यावरही साप नियंत्रण ठेवतो. विषारी सापाच्या विषापासून गंभीर रोगावर लस तयार केली जाते. त्यामुळे सापाला न मारता, त्यांचे रक्षण करावे. नाहीतर अन्नसाखळी मोडून निसर्गाचा समतोल बिघडायला वेळ लागणार नाही.
अजय कुकडकर, सर्पमित्र व वन्यजीवप्रेमी, गडचिरोली