वैनगंगा नदीत पुन्हा बांधली पाळ
By admin | Published: June 24, 2017 01:22 AM2017-06-24T01:22:08+5:302017-06-24T01:22:08+5:30
वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी खालावल्याने मागील तीन दिवसांपासून गडचिरोली शहरात अपुरा पाणीपुरवठा होत होता.
पुरेसा पाणीपुरवठा होणार : आठ दिवसांपूर्वीच बंधारा गेला वाहून
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी खालावल्याने मागील तीन दिवसांपासून गडचिरोली शहरात अपुरा पाणीपुरवठा होत होता. नगर परिषदेने शुक्रवारी नदीपात्रात पोकलँड मशिनच्या साह्याने पाळ तयार केली. त्यामुळे आता पूर्ववत पाणीपुरवठा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
गडचिरोली शहराला वैनगंगा नदीतून पाणीपुरवठा केला जातो. मार्च महिन्यात नदीची पातळी खालावली होती. त्यामुळे नगर परिषदेने जॉकवेलजवळ पोकलँड मशीनच्या सहाय्याने मार्च महिन्यातच बंधारा बांधला होता. या बंधाऱ्यामुळे जॉकवेलला पुरेसे पाणी उपलब्ध होत होते. ८ दिवसांपूर्वी गोसेखुर्द धरणाचे पाणी वैनगंगा नदीत सोडण्यात आले. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये बांधण्यात आलेला बंधारा वाहून गेला. परिणामी जॅकवेल पुन्हा उघड्यावर पडली. त्यामुळे मागील तीन दिवसांपासून जॅकवेलमध्ये पुरेसे पाणी जमा होत नसल्याने शहरालाही अपुरा पाणीपुरवठा होत होता. ही बाब नगराध्यक्ष योगीता पिपरे व पाणीपुरवठा सभापती केशव निंबोड, नगरसेवक प्रमोद पिपरे यांच्या लक्षात येताच त्यांनी नगर परिषद कर्मचाऱ्यांसह वैनगंगा नदीतील पाणी पातळीची पाहणी केली. त्याचबरोबर शुक्रवारी पोकलँड मशिनच्या सहाय्याने बंधारा बांधला. आता पुरेशा प्रमाणात पाणी जॅकवेलजवळ उपलब्ध झाले आहे. त्यामुळे पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होईल, अशी अशा नगर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. यावेळी पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी शरद सोनटक्के, बंडू काळे, सुरेश जुआरे, माजी नगरसेवक अजय बारसागडे, उमेश बारसागडे, रमेश बारसागडे उपस्थित होते.
पाण्याचा काटकसरीने वापर करा
दिवसेंदिवस पाण्याची भीषण समस्या निर्माण होणार आहे. त्यामुळे शहरवासीयांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा. प्रत्येक नळधारकांनी नळांना टोट्या लावाव्या, टिल्लू पंपाचा वापर टाळावा, असे आवाहन नगराध्यक्ष योगीता पिपरे व पाणी पुरवठा सभापती केशव निंबोड यांनी केले आहे.