पाणी प्रकल्पातून ४१ हजार प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 01:33 AM2018-05-28T01:33:34+5:302018-05-28T01:33:34+5:30
गावकऱ्यांना थंड व शुध्द पाणी मिळावे, या हेतुने तालुक्यातील अरततोंडी ग्रामपंचायत प्रशासनाने आरओ पाणी प्रणाली व शुध्दीकरण प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पाच्या माध्यमातून अरततोंडी ग्रामपंचायतीला दीड वर्षात एटीएम रिचार्ज कार्डातून ४१ हजार ७० रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : गावकऱ्यांना थंड व शुध्द पाणी मिळावे, या हेतुने तालुक्यातील अरततोंडी ग्रामपंचायत प्रशासनाने आरओ पाणी प्रणाली व शुध्दीकरण प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पाच्या माध्यमातून अरततोंडी ग्रामपंचायतीला दीड वर्षात एटीएम रिचार्ज कार्डातून ४१ हजार ७० रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
सदर प्रकल्पांतर्गत एटीएम कार्डद्वारे पाच रूपयांत पिण्यासाठी २० लिटर थंड व शुध्द पाणी मिळत आहे. सदर पाण्याचे निर्जंतुकीकरणही केले जात आहे. सदर उपक्रमाबाबत या ग्रामपंचायतीचे कौतुक होत आहे. अशुध्द पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे आपल्या गावातील नागरिकांना शुध्द पाणी मिळावे, यासाठी २०१५ मध्ये ग्रामसभेने पाणी प्रकल्प कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला. पेसा अंतर्गत ग्रामसभा कोष समितीच्या पाच टक्के अबंध निधीतून सदर उपक्रमासाठी ४ लाख ९० हजार रूपयांचा खर्च करण्यात आला. मागील दीड वर्षाहून अधिक कालावधीपासून हा पाणी प्रकल्प सुरू आहे. अरततोंडी गट ग्रामपंचायती अंतर्गत अरततोंडी, खरमतटोला व देऊळगाव येथील ३८९ कुटुंबातील २ हजार ११८ लोकांना हे शुध्द पाणी उपलब्ध होत आहे. २० लिटरची प्लास्टिक कॅन प्रत्येक कुटुंबासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. वीज बिलाचा खर्च वाचविण्यासाठी सौरऊर्जेवर हा प्रकल्प यापुढे चालविण्यात येईल, अशी माहिती ग्रामसेवक महेंद्र देशमुख यांनी दिली.