मंजुरी मिळाली, टॉवरचा पत्ता नाही
By admin | Published: July 17, 2017 01:02 AM2017-07-17T01:02:40+5:302017-07-17T01:02:40+5:30
अहेरी तालुक्यातील तिमरन ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या गुड्डीगुडम या ठिकाणी केंद्र शासनाने सहा महिन्यांपूर्वी मोबाईल टॉवर मंजूर केले आहे.
निर्मितीकडे बीएसएनएलचे दुर्लक्ष : गुड्डीगुडम येथे सहा महिन्यांपासून टॉवर मंजूर
लोकमत न्यूज नेटवर्क
गुड्डीगुडम : अहेरी तालुक्यातील तिमरन ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या गुड्डीगुडम या ठिकाणी केंद्र शासनाने सहा महिन्यांपूर्वी मोबाईल टॉवर मंजूर केले आहे. मात्र अजूनपर्यंत या ठिकाणी टॉवरचे बांधकाम करण्यात आले नाही.
गुड्डीगुडम हा परिसर अतिदुर्गम व अतिसंवेदनशील भागात येतो. या भागात दळणवळणाच्या सुविधांचा विस्तार व्हावा, या उद्देशाने केंद्र शासनाच्या गृहमंत्रालयाने गडचिरोली जिल्ह्यात एकूण ९० टॉवर निर्मितीच्या कामाला मंजुरी दिली. त्यानंतर लगेच बीएसएनएलकडे निधी सुध्दा उपलब्ध झाला. या ९० टॉवरमध्ये गुड्डीगुडम येथील मोबाईल टॉवरचाही समावेश आहे. मंजुरी मिळल्यानंतर गुड्डीगुडम येथील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र सहा महिने उलटूनही बांधकाम होत नसल्याने नागरिकांमध्ये निराशा निर्माण झाली आहे. याकडे पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
गुड्डीगुडम येथे ग्रामपंचायत कार्यालय, वनोपज तपासणी नाका, जिल्हा परिषद शाळा, माध्यमिक आश्रमशाळा, तलाठी कार्यालय आहेत. या सर्व कार्यालयांसाठी इंटरनेट व मोबाईलची सुविधा असणे आवश्यक आहे. शाळेमध्ये आता डिजिटल साधनेही आले आहेत. या साधनांचा वापर होण्यासाठी इंटरनेट कनेक्टीव्हिटी अत्यंत गरजेचीे आहे. त्यामुळे टॉवरचे बांधकाम तत्काळ करावे, अशी मागणी आहे.