महिला व बाल रुग्णालयाच्या पदनिर्मितीस मान्यता
By Admin | Published: January 5, 2017 01:35 AM2017-01-05T01:35:52+5:302017-01-05T01:35:52+5:30
स्थानिक इंदिरा गांधी चौकात एक वर्षापूर्वी बांधून पूर्ण झालेल्या १०० खाटांच्या महिला व बाल रुग्णालयात
९७ पदे भरणार : जिल्हावासीयांच्या मागणीला मिळाला न्याय
गडचिरोली : स्थानिक इंदिरा गांधी चौकात एक वर्षापूर्वी बांधून पूर्ण झालेल्या १०० खाटांच्या महिला व बाल रुग्णालयात डॉक्टर व कर्मचारी यांची पदे भरण्यास राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने मान्यता दिली आहे.
तत्कालीन पालकमंत्री आर. आर. पाटील यांनी महिला रुग्णालयाच्या बांधकामाची मुहूर्तमेढ रोवली. या रुग्णालयाला राज्य शासनाकडून वेळोवेळी निधी उपलब्ध करून देण्यात आला. त्यामुळे नियोजित कालावधीत या रुग्णालयाची इमारत बांधून एक वर्षापूर्वीच पूर्ण झाली. मात्र सदर रुग्णालयात पदभरती झाली नसल्याने रुग्णालय सुरू झाले नव्हते.
आरोग्य विभागाने २ जानेवारी रोजी शासन निर्णय काढून या रुग्णालयात पदे भरण्यास मान्यता दिली आहे. या रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक, स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, बधिरीकरण तज्ज्ञ, क्ष-किरण शास्त्रज्ञाचे प्रत्येकी एक पद भरले जाणार आहे. बधिरीकरण शास्त्रज्ञ, बालरोग तज्ज्ञ यांची प्रत्येक दोन पदे भरली जाणार आहेत. वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग तज्ज्ञ) यांची तीन पदे, वैद्यकीय अधिकाऱ्यांची पाच पदे, सहायक अधिसेविका व प्रशासकीय अधिकाऱ्याचे एक पद, परिसेविकेची पाच पदे, बालरोग परिचारिकेची आठ पदे, आहार तज्ज्ञ एक, २० अधिपरिचारिका, दोन रक्तपेढी तंत्रज्ञ, दोन प्रयोगशाळा तंत्रज्ञ, एक ईसीजी तंत्रज्ञ, तीन औषध निर्माण अधिकारी, तीन प्रयोगशाळा तंत्रज्ञ, एक कार्यालयीन अधीक्षक, एक वरिष्ठ लिपीक अशी एकूण ६८ पदे भरली जाणार आहेत. त्याचबरोबर दोन कनिष्ठ लिपिक, दोन बाह्य रुग्ण लिपिक, एक भांडार तथा वस्त्रपाल, एक व्रणोपचारक, दोन शस्त्रक्रिया गृहपरिचर, एक रक्तपेढी परिचर, तीन अपघात विभाग सेवक, १० कक्ष सेवक, एक प्रयोगशाळा परिचर, एक बाह्य रुग्ण सेवक, दोन शिपाई, तीन सफाईगार अशी एकूण २९ पदे भरली जाणार आहेत.
स्त्री व बालरुग्णालय सुरू झाल्यास जिल्हा सामान्य रुग्णालयावरील भार कमी होण्यास फार मोठी मदत होणार आहे. राज्य शासनाने धुळे, गडचिरोली, चंद्रपूर व नंदुरबार या चार ठिकाणी महिला रुग्णालये बांधली होती. इतर तीन ठिकाणीही पदभरतीस मान्यता दिली आहे. त्याचबरोबर जिल्हाभरातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र यामध्ये सुद्धा नव्याने पदभरती केली जाणार आहे.
राज्यभरात एकूण आरोग्य विभागाच्या मार्फतीने १ हजार ३३२ पदे भरली जातील, तर ३३५ पदे बाह्य यंत्रणेच्या मार्फतीने भरली जाणार आहेत. (नगर प्रतिनिधी)