बिनागुंडात रेकॉर्डब्रेक तेंदू संकलन
By admin | Published: May 28, 2017 01:16 AM2017-05-28T01:16:47+5:302017-05-28T01:16:47+5:30
यावर्षी तेंदूपत्ता अधिक प्रमाणात आला. त्याचबरोबर तेंदूपत्त्याचा दर्जा अतिशय चांगला आहे.
नियोजनबद्ध काम : मागील वर्षीच्या तुलनेत चारपट मिळाला भाव
लोकमत न्यूज नेटवर्क
लाहेरी : यावर्षी तेंदूपत्ता अधिक प्रमाणात आला. त्याचबरोबर तेंदूपत्त्याचा दर्जा अतिशय चांगला आहे. परिणामी यावर्षी पहिल्यांदाच बिनागुंडा भागात रेकॉर्डब्रेक १५ हजार पुडा तोडण्यात आला आहे.
लाहेरी परिसरातील आलदंडी, मुरंगल, कोयर, बंगाळी, गोवनार या गावांनी तेंदू संकलनासाठी पर्याय १ ची निवड केली होती. तेंदूपत्ता संकलन अधिक प्रमाणात व्हावा, यासाठी मागील एक महिन्यापासून नियोजन केले होते. यावर्षी तेंदूपत्ता तेजीत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत जवळपास चारपट भाव मिळाला आहे. त्यामुळे तेंदू मजुरांमध्येसुद्धा उत्साहाचे वातावरण आहे.
मागील १५ दिवसांपासून या भागातील नागरिकांनी तेंदूपत्ता संकलनाला सुरुवात केली. पहाटेलाच जंगलात जाऊन तेंदूपत्ता संकलन केले जात आहे. रात्री उशिरापर्यंत फळीवर तेंदूपत्ता नेला जात आहे. सुकलेला तेंदूपत्ता उचलण्याचेही काम कंत्राटदाराने सुरू केले आहे. यापूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणात कधीच तेंदूपत्ता संकलन झाले नव्हते. अधिकचा तेंदूपत्ता संकलीत झाल्याने मजुरांना मजुरीही अधिकची मिळणार आहे.