एकाच दिवशी १५ लाखांचा कर वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 12:25 AM2018-03-15T00:25:40+5:302018-03-15T00:25:40+5:30
नगर परिषदेने थकीत मालमत्ता करधारकांविरोधात मंगळवारपासून जप्तीची मोहीम सुरू केली आहे. या कारवाईचा धसका घेत शासकीय कार्यालये व खासगी नागरिकांनी कर भरण्यास सुरुवात केली आहे.
ऑनलाईन लोकमत
गडचिरोली : नगर परिषदेने थकीत मालमत्ता करधारकांविरोधात मंगळवारपासून जप्तीची मोहीम सुरू केली आहे. या कारवाईचा धसका घेत शासकीय कार्यालये व खासगी नागरिकांनी कर भरण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी एकाच दिवशी सुमारे १५ लाख रूपयांची कर वसुली करण्यात आली आहे.
नगर परिषदेच्या जप्ती व वसुली पथकाने बुधवारी शिक्षक कॉलनी, चनकाई नगर, महिला महाविद्यालयाचा परिसर, कारिगल चौक व कॉम्प्लेक्स परिसरात वसुलीची मोहीम राबविली. खासगी व्यक्तींकडून जवळपास तीन लाख रूपयांचा कर वसूल केला आहे. शिक्षक कॉलनीतील दोन नागरिकांची दोन दुचाकी वाहने जप्त केली आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे सुमारे ९ लाख ९० हजार रूपयांचा कर थकला होता. बुधवारी या कार्यालयाने कराचा भरणा केला. सार्वजनिक बांधकाम विभागाने १ लाख ५१ हजार रूपये व महिला महाविद्यालयाने ५० हजार रूपयांचा कर भरला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बाजूला असलेल्या जिल्हा प्रशिक्षण कार्यालयाकडे सुमारे १ लाख ९ हजार रूपयांचा कर थकला आहे. या कार्यालयावरही कारवाई करण्यासाठी वसुली पथक गेले असता, एक ते दोन दिवसात धनादेश उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन प्रशिक्षण पथकाच्या कर्मचाऱ्यांनी दिले. त्यानंतर कारवाई मागे घेण्यात आली.
गडचिरोली नगर परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात जप्तीची कारवाई केली जात आहे. यापूर्वी केवळ वसुली पथकाचे कर्मचारी घरोघरी फिरून कर वसूल करीत होते. मात्र नगर परिषद कोणतीही कारवाई करीत नसल्याचा भ्रम नागरिकांमध्ये निर्माण झाला होता. परिणामी वेळोवेळी नोटीस बजावूनही कराचा भरणा करीत नव्हते. जप्तीची कारवाईनंतर मात्र थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत. सदर कारवाई आणखी १५ दिवस चालणार आहे. ज्यांच्याकडे जास्त वर्षांपासून कर थकीत आहे, अशांवर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती कर निरीक्षक चंद्रशेखर पुण्यपवार यांनी दिली.