गोंडवाना विद्यापीठाचा अजब कारभार; प्राध्यापक भरती गाजावाजा करून अन् निवड मात्र मेल पाठवून!
By संजय तिपाले | Published: September 29, 2023 11:17 AM2023-09-29T11:17:22+5:302023-09-29T11:22:29+5:30
उमेदवारांमध्ये संभ्रम : निकालाकडे डोळे लावून बसलेल्यांचा हिरमोड
संजय तिपाले
गडचिरोली : येथील गाेंडवाना विद्यापीठात सहायक प्राध्यापकांच्या ३० जागांसाठी भरती प्रक्रिया झाली; परंतु, निवड झालेल्यांना थेट मेल पाठवून गुड न्यूज देण्यात आली. निकाल जाहीर झाल्यावर विद्यापीठाने नोटिफिकेश न काढल्याने इतर उमेदवारांमध्ये संभ्रम कायम आहे. त्यामुळे भरती प्रक्रिया जाहिरात देऊन केली; पण रुजू करून घेताना बाळगलेल्या गोपनीयतेमुळे निकालाकडे डोळे लावून बसलेल्या उमेदवारांचा मोठा हिरमोड झाला आहे.
राज्यात सर्व विद्यापीठांत भरती प्रक्रिया बंद आहे. मात्र, एकमेव गोंडवाना विद्यापीठात भरतीला मान्यता मिळाली. ४ फेब्रुवारी २०२३ रोजी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनुसार मराठी, इंग्रजी, गणित, रसायनशास्त्र, संगणकशास्त्र, जनसंवाद, अर्थशास्त्र, व्यवस्थापनाशस्त्र आदी विषयांसाठी सहायक प्राध्यापकांच्या निवडी करायच्या होत्या. पदभरतीच्या जाहिरातीनुसार एससी १, व्हीजे-ए १, एनटी-बी १, एनटी-सी २, एनटी-डी १, एसबीसी १, ओबीसी ९, ईडब्लूएस ३ व खुला ११ अशा जागा होत्या. यासाठी बाराशेपेक्षा अधिक उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले होते. जुलै महिन्यात मुलाखती पार पडल्या.
मराठीसाठी उत्तर प्रदेशच्या उमेदवाराची भरती
- सहायक प्राध्यापक भरतीत पदव्युत्तर अभ्यासक्रमात संदर्भ ग्रंथ असलेल्या उच्चविद्याविभूषित चार उमेदवार होते; परंतु, त्यापैकी एकालाही रुजू होण्याबाबत मेल आला नाही.
- विशेष म्हणजे, मराठी विषयासाठी निवड केलेला एक उमेदवार मूळचा उत्तर प्रदेशचा आहे, त्यामुळे उमेदवारांमध्ये शंका- कुशंका निर्माण झाल्या आहेत.
- तब्बल दोन महिन्यांनी निवड समितीने निवडलेल्या उमेदवारांना थेट मेल पाठवून बोलावले व रुजू करून घेतले. मात्र, भरती प्रक्रिया पूर्ण झाली असल्याबाबत कोणतीही सूचना संकेतस्थळावर दिली नाही, त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला आहे.
विषयतज्ज्ञ म्हणतात, विद्यापीठालाच विचारा
यासंदर्भात दोन विषयतज्ज्ञांना संपर्क केला असता एका तज्ज्ञांनी नाव न छापण्याच्या अटीवर विषयतज्ज्ञांनी गुण दिलेले उमेदवार रुजू करून घेतले नाही, मग आणखी वेगळे निकष लावून गुणांकन केले असेल तर माहीत नाही, विद्यापीठालाच विचारा, असे उत्तर दिले. दुसरे विषयतज्ज्ञ म्हणाले, अंतिम निवड कोणाची केली, हे मला माहिती नाही, आम्ही फक्त योग्य ते गुणांकन केले.
उमेदवार म्हणतात...
मराठी विषयासाठी मी मुलाखत दिली होती. विषयतज्ज्ञांनी मला क्रमांक एकचे गुणांकन दिले होते; परंतु, मला मेल आला नाही. कोणी तरी दुसरेच रुजू झाल्याचे कळाल्यावर मला तर धक्काच बसला.
- एक उमेदवार
जनसंवादसाठी माझी मुलाखत चांगली झाली होती. तज्ज्ञांनी चांगले गुण दिले होते. मला ना मेल आला ना कॉल, त्यामुळे आश्चर्य वाटले. भरती पारदर्शक आहे तर निकाल जाहीर करणे अपेक्षित होते.
- एक उमेदवार
ज्यांची निवड झाली त्यांना नाही तर कोणाला मेल पाठवायचे होते. विद्यापीठ अनुदान आयोगाने निवड यादी लावणे बंधनकारक केलेले नाही. विषय तज्ज्ञांनी गुणांकन केल्यानंतर आणखी वेगळे निकष लावले किंवा नाही, याबाबत मला काहीच प्रतिक्रिया द्यायची नाही.
- डॉ. प्रशांत बोकारे, कुलगुरू, गोंडवाना विद्यापीठ