रेगडी धरण तळाला, चिचडोह घटला; मामा तलावांचाही घसा कोरडा झाला !

By गेापाल लाजुरकर | Published: May 31, 2024 10:39 PM2024-05-31T22:39:58+5:302024-05-31T22:40:13+5:30

गडचिरोली जिल्ह्यात ३८ टक्केच पाणीसाठा : महिनाभरात ६ टक्क्यांनी घट

Regadi dam bottomed, Chichdoh receded; Even the throat of mama ponds became dry! | रेगडी धरण तळाला, चिचडोह घटला; मामा तलावांचाही घसा कोरडा झाला !

रेगडी धरण तळाला, चिचडोह घटला; मामा तलावांचाही घसा कोरडा झाला !

गडचिरोली : पावसाळा तोंडावर असतानाच उन्हाची काहिलीही दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच जलस्त्रोतातील पाणी झपाट्याने घटत आहे. जिल्ह्यातील २०० वर गावांमध्ये सध्या पाण्याची टंचाई आहे. प्रमुख प्रकल्पही कोरडे पडत असून रेगडी व चिचडोह प्रकल्पातील पाणीसाठा प्रचंड घटलेला आहे. सध्या जिल्ह्यात ३८.४१५ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईच्या तीव्र झळा बसत आहेत.

जिल्ह्यात वैनगंगा नदीवरील चिचडोह बॅरेज तर रेगडीजवळ दिना नदीवर दिना प्रकल्प आहे. जिल्ह्यात मोठे धरण नाही. दिना धरणाचेही पाणी पावसाळ्याच्या अंतिम टप्प्यात शेतीला व रब्बी हंगामात पिकांनासुद्धा सोडले जाते. सध्या या प्रकल्पातील पाण्याची पातळी झपाट्याने खालावली आहे. जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या वैनगंगा नदीला गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडले जाते. त्यामुळे चामोर्शीजवळ बांधलेल्या चिचडोह धरणात पुरेसा पाणीसाठा असतो; परंतु यावर्षी पाणी टंचाईमुळे धरणाच्या खालील भागात पाणी सोडले जात असल्याने गेल्या महिनाभरात येथील जलसाठा निम्म्याहून घटला. या नदीवरून कार्यान्वित करण्यात आलेल्या पाणीपुरवठा नळयोजना प्रभावित झाल्या आहेत. गेल्या महिनाभरात मामा तलाव व लघु प्रकल्प कोरडे झाल्याने जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प मिळून एकूण ६ टक्के पाणीसाठ्यात घट झाली.

१०.७९०
दशलक्ष घन मीटर पाणी रेगडी जलाशयात

चामोर्शी तालुक्याच्या रेगडी येथील दिना प्रकल्पात सध्या १५.९७ टक्के तर १०.७९० -दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील बहुतांश तलाव कोरडेठाक आहेत.


माजी मालगुजारी तलाव आटले

पाटबंधारे विभागाअंतर्गत जिल्ह्यात १५ माजी मालगुजारी तलाव आहेत. यामध्ये घोट, तळोधी, हिरापूर, येलगूर, रावणवाडी, कसारी, विसोरा, बोळधा, वडेगाव, गडचिरोली, राजगट्टा, धानोरा, वडधा, बोदली आदी गावांतील तलावांचा समावेश आहे. यातील काही तलाव आटले आहेत तर काही तलाव आटण्याच्या मार्गावर आहेत.

लघुप्रकल्पांनीही गाठली पातळी

लघुपाटबंधारे विभागाअंतर्गत ९ लघुप्रकल्प आहेत. यात येंगलखेडा, कोसरी, कुनघाडा, अनखोडा, लगाम, अमरादी, कमलापूर, पेंटीपाका, येर्रावागू आदींचा समावेश आहे. या प्रकल्पांनीही पातळी गाठली आहे.


चिचडोह बॅरेजमधील पाणीसाठा १४ टक्क्यांनी घटला

वैनगंगा नदीवर चामोर्शी शहरानजीक बांधलेल्या चिचडोह बॅरेजमध्ये महिनाभरापूर्वी ५०.९३१ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होता. आता ४२.१७७ पाणीसाठा उपलब्ध आहे. तर येथील पाण्याची मागील टक्केवारी ८२.१२४ हून घटून ६८ वर आली. महिनाभरात तब्बल १४ टक्क्यांनी पाणीसाठा घटला.


जिल्ह्यातील प्रकल्प, पाणीसाठ्याची स्थिती (द.घ.मी)

प्रकल्प :  संकल्पित साठा : सध्याचा साठा : टक्केवारी

मोठे : ६७.५४० : १०.७९०: १५.९७६

मध्यम : ६२.०१७ : ४२.१७७ : ६८.००९

लघु प्रकल्प : २६.७१० : ७.०६३ : २६.४४३

एकूण : १५६.२६७ : ६०.०३० : ३८.४१५

Web Title: Regadi dam bottomed, Chichdoh receded; Even the throat of mama ponds became dry!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.