२४ हजार शेतकऱ्यांची पीक विम्यासाठी नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 01:13 AM2017-07-19T01:13:48+5:302017-07-19T01:13:48+5:30
खरीप हंगामासाठी जिल्हाभरातील २३ हजार ७०० शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे.
३१ जुलैपर्यंत मुदत : शेतकऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : खरीप हंगामासाठी जिल्हाभरातील २३ हजार ७०० शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे.
संपूर्ण देशभरासाठी पंतप्रधान पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील पीक विम्याची जबाबदारी रिलायन्स कंपनीवर सोपविण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास संबंधित शेतकऱ्याला आर्थिक मदत मिळावी, किमान त्याचा उत्पादन खर्च भरून निघावा. या उद्देशाने पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. जवळपास सर्वच पिकांचा विमा काढला जात असला तरी गडचिरोली जिल्ह्यात खरीप हंगामात धानाचे पीक प्रामुख्याने घेतले जाते. त्यामुळे बहुतांश शेतकरी धानाचाच विमा काढतात. कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत जाऊन विमा काढता येते. पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा काढणे सक्तीचे करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या पीक कर्जाच्या रकमेतून पीक विम्याची रक्कम वजा केली जाते. त्यामुळे त्यांना स्वतंत्र पीक विमा काढण्याची गरज पडत नाही.
जे शेतकरी पीक विमा घेत नाही, अशाही शेतकऱ्यांना विमा काढता येतो. प्रती एकरी ठरविलेली रक्कम सातबारासह बँकेत जमा केल्यास पिकाचा विमा निघतो. जिल्हाभरातील २३ हजार ७०० शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. यापूर्वी पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अतिशय कमी होती. मात्र कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना विम्याची सक्ती केल्याने पीक विमा काढणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
३०२ सोयाबीन उत्पादकांना लाभ
मागील वर्षी सोयाबीन उत्पादकांचे फार मोठे नुकसान झाले. काही शेतकऱ्यांचा तर उत्पादन खर्चही भरून निघाला नाही. प्रामुख्याने चामोर्शी तालुक्यात सोयाबीन पिकाची लागवड केली जाते. याच तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी विमा काढला होता. ज्या शेतकऱ्यांचे जास्त नुकसान झाले, अशा ३०२ शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम देण्यात आली आहे.
खरीप पिकांचा विमा काढण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०१७ पर्यंत ठेवण्यात आली आहे. तलाठी, कृषी सहायक यांच्या मार्फत शेतकऱ्यांना पीक विम्याचे महत्त्व पटवून दिले जात असल्याने पीक विमा काढणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.