नगर पंचायत आरक्षणाची सोडत
By admin | Published: August 15, 2015 12:13 AM2015-08-15T00:13:11+5:302015-08-15T00:13:11+5:30
जिल्ह्यातील कोरची, कुरखेडा, आरमोरी, धानोरा, चामोर्शी, मुलचेरा, एटापल्ली, भामरागड, अहेरी व सिरोंचा या नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता ....
गडचिरोली : जिल्ह्यातील कोरची, कुरखेडा, आरमोरी, धानोरा, चामोर्शी, मुलचेरा, एटापल्ली, भामरागड, अहेरी व सिरोंचा या नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता प्रभाग रचनेच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला असून, ही सोडत २० व २१ आॅगस्टला होणार आहे.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण गट व महिलांसाठी राखीव ठेवावयाच्या जागा सोडत पध्दतीने निश्चित करण्यात येणार आहेत. कोरची, आरमोरी, धानोरा, चामोर्शी व अहेरी या नगर पंचायतींची सोडत तेथील नगर पंचायत कार्यालयांमध्ये २० आॅगस्टला दुपारी १२ वाजता होणार आहे. आरक्षण सोडत काढण्यासंदर्भात प्राधिकृत अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोरचीकरिता प्राधिकृत अधिकारी म्हणून एम.डी. टोनगावकर, आरमोरी डी.जी. नान्हे, धानोरा डी.एस.सोनवने, चामोर्शी जी.एम.तळपाडे, अहेरी जे.डी. पाटील या उपविभागीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.कुरखेडा, भामरागड, एटापल्ली, मुलचेरा व सिरोंचा येथील नगर पंचायतीची आरक्षण सोडत २१ आॅगस्ट रोजी दुपारी १२ वाजता संबंधित नगर पंचायत कार्यालयांमध्ये होणार आहे. कुरखेडाकरिता प्राधिकृत अधिकारी म्हणून एम.डी. टोनगावकर, भामरागड डी.जी.नान्हे, एटापल्ली डी.एस.सोनवने, मुलचेरा जी.एम.तळपाडे व सिरोंचासाठी जे.डी.पाटील या उपविभागीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
वरील सर्व अधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याकरिता कोरची, चामोर्शी, अहेरी, भामरागड साठी नियंत्रण अधिकारी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी सुनील गाढे व जिल्हा प्रशासन अधिकारी विनोद जाधव यांची सहायक समन्वयक अधिकारी म्हणून नियुक्ती आली आहे.
आरमोरी, धानोरा, कुरखेडा, मुलचेरा व एटापल्लीकरिता निवासी उपजिल्हाधिकारी सुनील गाढे यांची नियंत्रण अधिकारी म्हणून, तर गडचिरोली नगर परिषदचे मुख्याधिकारी गिरीश बन्नोरे यांची सहायक समन्वक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी दिली. (नगर प्रतिनिधी)