५ वर्षात दहा महिने नियमित मुख्याधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2020 05:00 AM2020-08-30T05:00:00+5:302020-08-30T05:01:12+5:30
एटापल्ली नगर पंचायतमध्ये वारंवार मुख्याधिकारी बदलले जात असल्याने विकास कामांवर परिणाम होत आहे. त्यामुळे न.पं.ला स्थायी मुख्याधिकारी द्यावे. या पदावर नायब तहसीलदारांची नियुक्ती करावी. त्याजागी आयएएस अधिकारी नको, असे नगरसेवक रमेश टिकले यांनी म्हटले आहे. नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून आयएएस अधिकाऱ्यांच्या जागी नायब तहसीलदारांची नियुक्ती मुख्याधिकारीपदी करण्याची मागणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : एटापल्ली ग्रामपंचायतीला ३ एप्रिल २०१५ रोजी नगरपंचायतीचा दर्जा मिळाला. नगरपंचायतची स्थापना होऊन पाचवर्ष पूर्ण झाली. या पाच वर्षाच्या कालावधीत दोन मुख्याधिकारी नियमित फक्त दहा महिन्यांच्या कालावधीकरिता मिळाले. मात्र पाच वर्षात प्रभारी मुख्याधिकाऱ्यांच्या भरवशावरच चार वर्षाच्या कार्यकाळ होता. प्रभारी मुख्याधिकाऱ्यांमुळे विकासकामांवर परिणाम होत आहे.
नगरपंचायत निर्माण झाल्यानंतर शहराचा कायापालट होईल, अशी आशा नागरिकांमध्ये निर्माण झाली होती. परंतु ही अपेक्षा दिवास्वप्न ठरले. नगरपंचायत स्थापनेनंतर सुरूवातीला ३ जुलै ते २८ डिसंबर २०१५ पर्यंत मुख्याधिकाऱ्यांचा प्रभार तहसीलदार एस. पी. खलाटे यांच्याकडे होता. डिसेंबर २०१५ ते ऑगस्ट २०१६ पर्यंत नायब तहसीलदार आर. बी. मेश्राम, त्यांनतर ऑगस्ट २०१६ ते डिसंबर २०१६ पर्यंत केवळ ४ महिने नियमित मुख्याधिकारी सुनील कोकणी यांनी काम पाहिले. त्यानंतर परत जानेवारी २०१७ ते डिसेंबर २०१९ पर्यंत तब्बल २ वर्ष नायब तहसीलदार एस.एन. सिलमवार यांच्याकडे मुख्याधिकाऱ्यांचा प्रभार होता. त्यानंतर नोव्हेंबर ते डिसेंबर २०१९ पर्यंत तहसीलदार सुभाष यादव यांच्याकडे मुख्याधिकाऱ्यांचा प्रभार होता. मात्र पदावर असतानाच त्यांचे निधन झाले. केवळ एक महिना यांच्याकडे प्रभार होता. त्यांच्या निधनानंतर जानेवारी ते फेबु्रवारी २०२० पर्यंत सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मनुज जिंदल यांच्याकडे प्रभार असताना फेबु्रवारी २०२० ला परत नियमित मुख्याधिकारी अजय साळवे नियुक्त झाले. परंतु त्यांच्याकडे अहेरी नगरपंचायतचा प्रभार सोपविण्यात आला. एटापल्लीपेक्षा अहेरीकडे त्यांचे जास्त लक्ष असायचे. याच महिन्यात त्यांची बदली अहेरीला झाली. यादरम्यान ते केवळ ६ महिने एटापल्ली येथे कार्यरत होते. नियमित मुख्याधिकारी मिळाल्यानंतर त्यांना कायम न ठेवणे हे एटापल्ली नगरपंचायतच्या पदाधिकारी व नगरसेवकांचे अपयशच म्हणावे लागेल. आता पुन्हा एसडीओ मनूज जिंदल यांच्याकडे मुख्याधिकाºयांचा प्रभार सोपविण्यात आला आहे.
एटापल्ली नगर पंचायतीला स्थायी मुख्याधिकारी मिळत नसल्याने व मिळालेले मुख्याधिकारी अहेरी नगर पंचायतीने हिरावून नेल्याने काहीसा रोष व्यक्त होत आहे.
आयएएस नको, नायब तहसीलदारच हवे
एटापल्ली नगर पंचायतमध्ये वारंवार मुख्याधिकारी बदलले जात असल्याने विकास कामांवर परिणाम होत आहे. त्यामुळे न.पं.ला स्थायी मुख्याधिकारी द्यावे. या पदावर नायब तहसीलदारांची नियुक्ती करावी. त्याजागी आयएएस अधिकारी नको, असे नगरसेवक रमेश टिकले यांनी म्हटले आहे. नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून आयएएस अधिकाऱ्यांच्या जागी नायब तहसीलदारांची नियुक्ती मुख्याधिकारीपदी करण्याची मागणी केली. परंतु ही मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळली. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे, असेही रमेश टिकले यांनी म्हटले आहे.