पुलाने जोडले दोन राज्यांचे संबंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 01:36 AM2019-01-17T01:36:21+5:302019-01-17T01:37:43+5:30
सिरोंचानजीकच्या गोदावरी नदीवर पुलाचे बांधकाम झाल्यानंतर या पुलावरून महाराष्ट्र-छत्तीसगड अशी थेट वाहतूक सुरू झाली आहे. शिवाय राज्य परिवहन महामंडळाच्या अहेरी आगाराची बसफेरी इंद्रावती नदीच्या पुलाच्या बाजूने लहानशा मार्गातून थेट छत्तीसगड राज्याकडे सुरू करण्यात आली आहे.
कौसर खान ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : सिरोंचानजीकच्या गोदावरी नदीवर पुलाचे बांधकाम झाल्यानंतर या पुलावरून महाराष्ट्र-छत्तीसगड अशी थेट वाहतूक सुरू झाली आहे. शिवाय राज्य परिवहन महामंडळाच्या अहेरी आगाराची बसफेरी इंद्रावती नदीच्या पुलाच्या बाजूने लहानशा मार्गातून थेट छत्तीसगड राज्याकडे सुरू करण्यात आली आहे. पुलाच्या बांधकामामुळे महाराष्ट्र व छत्तीसगड या दोन राज्यातील लोकांचे संबंध चांगले जुळले आहेत.
सिरोंचा तालुक्यातून तेलंगणा राज्यातील निजामाबाद व छत्तीसगड राज्यातील जगदलपूरपर्यंत राष्ट्रीय महामार्ग करण्यात येणार आहे. गोदावरी नदीच्या पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आता छत्तीसगडच्या इंद्रावती नदीवर पुलाचे बांधकाम सध्या कासवगतीने सुरू आहे. या पुलाचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे या परिसरात पाणी अडवून लहानसा मार्ग काढण्यात आला असून छत्तीसगड-महाराष्ट्र अशी प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. या मार्गाद्वारे राज्य परिवहन महामंडळाच्या अहेरी आगाराची बस थेट छत्तीसगडमधील भोपालपटनम येथे जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लोकांनीही व्यवसायाच्या दृष्टिकोनातून फायदा होत आहे. या मार्गे दररोज प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. अहेरी उपविभागात यापूर्वी पातागुडमपर्यंत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस पावसाळावगळता उन्हाळा व हिवाळा अशा आठ महिन्यांच्या कालावधीत सुरू असायचे. तेव्हा पावसाळ्यात प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता. मात्र आता पुलाची निर्मिती झाल्याने तसेच राष्ट्रीय महामार्गाचे काम जोमात सुरू असल्याने महामंडळाची बसफेरी सुरू झाली आहे. परिणामी बसने प्रवास करीत लगतच्या राज्यात जाता येत आहे. दररोज या राष्ट्रीय महामार्गावर जवळपास २०० वाहनांचे आवागमन होत आहे.
भोपालपटनमचे तिकीट ८५ रूपये
महाराष्ट्र-छत्तीसगड तसेच महाराष्ट्र-तेलंगणा अशी वाहतूक अहेरी उपविभागातून सुरू झाली आहे. अहेरी आगाराची बस सिरोंचावरून भोपालपटनम येथेही जात आहे. सिरोंचा ते भोपालपटनम हे ६७ किमीचे अंतर असून महामंडळाच्या बस तिकीट ८५ रूपये आहे. ८५ रूपयांमध्ये सिरोंचावरून भोपालपटनमला प्रवाशांना जात येत आहे. यापूर्वी अशा प्रकारची थेट प्रवासाची सुविधा नसल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. अहेरी उपविभागातील नागरिकांना छत्तीसगडच्या सीमावर्ती भागात पूर्वी पायी प्रवास करावा लागत होता. आता बस सुरू झाल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.