त्यांच्या अंत्यसंस्काराकडेही नातेवाईकांनी फिरविली पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 05:00 AM2021-04-29T05:00:00+5:302021-04-29T05:00:54+5:30
बहुतांश मृतांचे नातेवाईक काेराेनाचे नियम पाळत अंत्यदर्शन घेऊन अंत्यसंस्काराचे साेपस्कारही पार पाडतात. मात्र काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यू पावलेल्या सहा मृतांच्या नातेवाईकांनी चक्क अंत्यसंस्कारास उपस्थिती दर्शविण्यास नकार दिला. यामागे संबंधित कुटुंबीयांच्या काही अडचणी नक्कीच असतील, पण काेराेनाच्या आजाराने मृत्यू हाेणे किती क्लेषदायक आहे, हेच यातून सिद्ध हाेतआहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : काेराेनाने माणसाला माणसापासूनच दूर केले आहे. काेराेनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तीचा पिच्छा तर मरणानंतरही सुटत नसल्याचे दिसून येत आहे. काेराेनाने मृत्यू झालेल्या सहा रुग्णांच्या नातेवाईकांनी आम्ही त्यांचे अंत्यसंस्कार करणार नाही, असे स्पष्टपणे लिहून दिले. त्यामुळे गडचिराेली नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनीच त्या सहा मृतांवर अंत्यसंस्काराची जबाबदारी पार पाडली.
अंत्यविधीच्या निमित्ताने मृत व्यक्तीचे शेवटचे दर्शन घेता यावे, यासाठी सर्व कामे साेडून नातेवाईक, मित्र परिवार अंत्यविधीला उपस्थित राहतात. त्यामुळे अंत्यविधीला लग्न समारंभाप्रमाणेच गर्दी उसळते. पण काेराेनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाल्यास संसर्ग टाळण्यासाठी मृतदेह नातेवाईकांच्या हातात दिला जात नाही. मात्र मृत व्यक्तीच्या पाच नातेवाईकांना अंत्यसंस्काराचे साेपस्कार पार पाडण्यासाठी उपस्थित राहण्याची परवानी दिली जाते.
बहुतांश मृतांचे नातेवाईक काेराेनाचे नियम पाळत अंत्यदर्शन घेऊन अंत्यसंस्काराचे साेपस्कारही पार पाडतात. मात्र काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यू पावलेल्या सहा मृतांच्या नातेवाईकांनी चक्क अंत्यसंस्कारास उपस्थिती दर्शविण्यास नकार दिला. यामागे संबंधित कुटुंबीयांच्या काही अडचणी नक्कीच असतील, पण काेराेनाच्या आजाराने मृत्यू हाेणे किती क्लेषदायक आहे, हेच यातून सिद्ध हाेतआहे.
अंत्यविधीला आम्ही उपस्थित राहू शकत नाही, तुम्हीच अंत्यविधी पार पाडावे, असे संमतीपत्र लिहून देताना नातेवाईकांना किती दु:ख झाले असावे हे तेच सांगू शकतात.
अशी केली जाते अंत्यविधीची प्रकिया
काेराेनामुळे मृत्यू झाल्यास याबाबतची माहिती संबंधित रुग्णाच्या नातेवाईकांना रुग्णालय प्रशासनामार्फत दिली जाते. अंत्यविधीच्या माध्यमातून इतर नागरिकांमध्ये काेराेनाचा संसर्ग पसरू नये यासाठी मृतदेह नातेवाईकांच्या हातात दिला जात नाही. मात्र पाच नातेवाईकांना अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाते. नगर परिषदेच्या शववाहिकेने मृतदेह स्मशानघाटापर्यंत पाेहाेचविल्या जाते. दाेन नातेवाईक पीपीई किट घालून अंत्यविधीचे सर्व साेपस्कार पार पाडतात. नातेवाईक जर अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार नसतील तर याबाबत त्यांना आराेग्य विभागाकडे तसे लेखी लिहून द्यावे लागते. ही बाब नगर परिषदेला कळविली जाते व नगर परिषदेचे कर्मचारीच अंत्यसंस्कार करतात. नातेवाईकांनी लेखी लिहून न दिल्यास संबंधित व्यक्तीचा मृतदेह शवपेटीत ठेवून दाेन ते तीन दिवस नातेवाईकांची प्रतीक्षा केली जाते. त्यानंतरही नातेवाईक न आल्यास रुग्णालय प्रशासन पाेलीस स्टेशन व नगर परिषदेला कळविते. त्यानंतर नगर परिषदेचे कर्मचारीच मृतदेहावर अंत्यसंस्कार करतात.