गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 11:48 PM2018-04-05T23:48:55+5:302018-04-05T23:48:55+5:30
वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी प्रचंड प्रमाणात कमी झाली असून त्याचा फटका गडचिरोली शहराला बसत आहे. त्यामुळे गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडण्यात यावे, ....
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी प्रचंड प्रमाणात कमी झाली असून त्याचा फटका गडचिरोली शहराला बसत आहे. त्यामुळे गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी नगराध्यक्ष योगीता पिपरे यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे.
गडचिरोली शहराला वैनगंगा नदीतून पाणीपुरवठा केला जातो. नगर परिषदेने नदीपात्रात इनटेक वेल खोदली आहे. त्याच्या सभोवताला रेतीचा बंधारा सुद्धा बांधला आहे. विहिरीला दोन वॉल्व बसविण्यात आले आहेत. मात्र नदीच्या पाण्याची पातळी कमी झाल्याने एक वॉल्व पाण्याच्या बाहेर पडला आहे. त्यामुळे पाणी उपसा करणारे पंप बंद ठेवावे लागत आहे. याचा परिणाम शहरातील पाणीपुरवठ्यावर होत आहे. काही वॉर्डात दिवसातून एकचवेळा पाणीपुरवठा करावा लागत आहे. पाणीपातळी आणखी कमी झाल्यास दुसरा वॉल्व सुद्धा पाण्याबाहेर पडण्याची शक्यता आहे.
उन्हाळ्याला नुकतीच सुरुवात झाली आहे. अजून एप्रिल, मे व जून हे तीन महिने शिल्लक आहेत. पाण्याची पातळी आणखी कमी झाल्यास तीव्र जलसंकटांचा सामना करावा लागणार आहे. नगर परिषदेला दुसरे पाण्याचे स्त्रोत नाही. परिणामी वैनगंगा नदीच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागत असल्याने गोसेखुर्द धरणाचे पाणी नदीत साडावे, अशी मागणी केली आहे. निवेदन देतेवेळी नगराध्यक्ष योगीता पिपरे, उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, पाणीपुरवठा सभापती प्रवीण वाघरे, नगरसेवक प्रमोद पिपरे, केशव निंबोड, भूपेश कुळमेथे, पाणीपुरवठा विभागाचे शरद सोनटक्के उपस्थित होते.