ईटियाडोह धरणाचे पाणी सोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 01:40 AM2018-09-19T01:40:03+5:302018-09-19T01:42:03+5:30
१५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने धानपीक संकटात आले आहे. मात्र अजूनपर्यंत ईटियाडोह धरणाचे पाणी सोडण्यात आले नाही. पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी अरसोडा, मुल्लुरचेक, मुल्लुर रिठ येथील नागरिकांनी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने धानपीक संकटात आले आहे. मात्र अजूनपर्यंत ईटियाडोह धरणाचे पाणी सोडण्यात आले नाही. पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी अरसोडा, मुल्लुरचेक, मुल्लुर रिठ येथील नागरिकांनी केली आहे.
पावसाने उसंत घेतली आहे. त्याचबरोबर दिवसा कडक ऊन पडत आहे. त्यामुळे जमिनीला भेगा पडल्या आहेत. आरमोरी तालुक्यातील बहुतांश शेतीला ईटियाडोह धरणाचे पाणी उपलब्ध होते. पावसाने उसंत घेतल्यानंतर पाणी सोडणे आवश्यक होते. मात्र अजूनपर्यंत पाणी सोडण्यात आले नाही. त्यामुळे धानपीक करपायला लागले आहे. पाणी नसल्याने निंदनाचे काम बंद पडले आहे. तसेच खताचा दुसरा डोजही लांबणीवर पडला आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, असे शेतकरी विहीर, नाल्यावर इंजन लावून पाणी करीत आहेत. धानपीक गर्भाशयात येण्याच्या मार्गावर आहे. अशा स्थितीत पाण्याचा तुटवडा निर्माण झाल्याने याचा फटका धानपिकाला बसून उत्पादनात कमालीची घट निर्माण होण्याची शक्यता आहे. सर्वच शेतकरी पाणी सोडण्याची मागणी करीत असतानाही सिंचन विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. आरमोरीपासून ईटियाडोह धरण ५० पेक्षा अधिक किमी अंतर आहे. आरमोरी तालुक्यातील शेवटच्या शेतापर्यंत पाणी पोहोचण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी लागतो. तोपर्यंत धान करपण्याची शक्यता नाकारता येत नाही. उशिरा पाणी सोडल्यास पाण्यासाठी शेतकºयांचे भांडणे वाढतात. त्यामुळे पाणी सोडावे, अशी मागणी शेतकºयांनी सिंचन विभाग, ईटियाडोहचे शाखा अभियंता यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदनावर देवा खोब्रागडे, शालिकराम पत्रे, रितेश पिल्लारे, दिलीप पारधी, खुशाल राऊत, विनोद ठाकरे, दादाजी गुरनुले, बाबुराव दिघोरे, अभिमन्यू धोटे, मोहन बांडे, नानाभाऊ धोटे, विलास मैंद, नामदेव बावणे, तुकाराम जीवतोडे, मधुकर कुथे, श्रीराम कुथे, विलास जीवतोडे यांच्या स्वाक्षºया आहेत.