गडचिरोलीत वाघाच्या २ बछड्यांच्या मृतदेहाचे अवशेष आढळले, वाघिणीचा शोध सुरू
By दिगांबर जवादे | Published: January 8, 2023 10:14 AM2023-01-08T10:14:39+5:302023-01-08T10:23:11+5:30
वनविभागाने या हिंस्त्र वाघिणीला पकडण्याची मोहीम सुरू केली आहे.
दिगांबर जवादे, गडचिरोली
गडचिरोली: तालुक्यातील अमिर्झा बीटात पाच महिन्यांचे वय असलेल्या वाघाच्या बछड्यांच्या दोन मृतदेहाचे अवशेष आढळून आले आहेत.
अमिर्झा परिसरात टी-६ या वाघिणीचा मागील दोन वर्षांपासून वावर आहे. या वाघिणीला एकूण चार बछडे होते. मृतदेहाचे अवशेष आढळलेले बछडे याच वाघिणीचे असल्याची शक्यता वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. या वाघिणीने आजपर्यंत १० नागरिकांचा बळी घेतल्याची नोंद वनविभागाकडे आहे.
वनविभागाने या हिंस्त्र वाघिणीला पकडण्याची मोहीम सुरू केली आहे. अशातच ३ जानेवारी रोजी एका बछड्याच्या मृतदेहाचे अवशेष आढळले. त्यानंतर ६ जानेवारी रोजी पुन्हा २०० मीटर अंतरावर दुसऱ्या बछड्याच्या मृतदेहाचे अवशेष आढळले. अवशेषांमध्ये डोक्याची कवठी व शेपटीचा समावेश आहे. या परिसरात जवळपास सहा वाघ आहेत. यापैकी एका वाघाने बछड्यावर हल्ला करून त्यांना ठार केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ज्या परिसरात अवशेष आढळले तेथे वाघाची विष्टा आढळून आली. अवशेष हैदराबाद येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जाणार आहेत. या ठिकाणी डीएनए चाचणी होईल. त्यानंतर सदर बछडे नेमके कोणत्या वाघाचे आहेत हे स्पष्ट होईल.