स्थलांतरीत पक्ष्यांवर केले उपचार
By admin | Published: September 8, 2016 01:38 AM2016-09-08T01:38:03+5:302016-09-08T01:38:03+5:30
तालुक्यातील वघाळा (जुना) या गावी चिंचेच्या झाडावर देशी व विदेशी स्थलांतरीत पक्षी वास्तव्यास आहेत.
वन्यजीव संरक्षण समितीचा पुढाकार : पक्षी संवर्धनासाठी वघाळावासीय सरसावले
आरमोरी : तालुक्यातील वघाळा (जुना) या गावी चिंचेच्या झाडावर देशी व विदेशी स्थलांतरीत पक्षी वास्तव्यास आहेत. या पक्ष्यांनी झाडावर अंडी घालून पक्ष्यांना जन्म दिल्यामुळे स्थलांतरीत पक्ष्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. मात्र गेल्या आठ-दहा दिवसांपासून काही ठरावीक पक्षी चिंचेच्या झाडावरून खाली पडत आहेत, हे लक्षात आल्यावर पक्ष्यांना काही आजार आहे काय, हे तपासण्यासाठी वघाळा वन्यजीव (पक्षी) संरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पक्ष्यांना आरमोरी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात आणून त्यांची तपासणी केली.
चिंचेच्या झाडावरून खाली पडलेल्या पक्ष्यांना उचलून वघाळावासीय त्यांच्यावर उपचार करीत आहेत. मंगळवारी सकाळी झाडावरून पडलेल्या दोन पक्ष्यांना वघाळा वन्यजीव (पक्षी) संरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तपासणी व उपचारासाठी आरमोरीच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात आणले. येथे पशुधन विकास अधिकारी डॉ. किशोर पराते व औषधी संयोजक कर्णेवार यांनी पक्ष्यांवर उपचार केले.
यावेळी वन्यजीव संरक्षण समिती वघाळाचे अध्यक्ष रामदास दोनाडकर, विलास प्रधान, धनराज दोनाडकर, पांडुरंग आठवले, अशोक प्रधान, संतोष दोनाडकर व ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)