तफावत दूर करून सुधारित वेतन द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2017 12:47 AM2017-01-13T00:47:50+5:302017-01-13T00:47:50+5:30
कंत्राटी वाहन चालकांना नियमित वाहनचालकाच्या तुलनेत ३८ टक्केच वेतन मिळत आहेत.
कंत्राटी वाहनचालकांची मागणी
गडचिरोली : कंत्राटी वाहन चालकांना नियमित वाहनचालकाच्या तुलनेत ३८ टक्केच वेतन मिळत आहेत. या तुटपुंज्या वेतनावर कर्मचाऱ्यांना काम करावे लागत आहे. परिणामी कर्मचाऱ्यांना आर्थिक समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे कंत्राटी वाहनचालकांच्या मानधनातील तफावत दूर करून सुधारित मानधन अदा करावे, अशी मागणी जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या कंत्राटी वाहनचालकांनी शासनाकडे केली आहे.
२०१० मध्ये कंत्राटी वाहनचालकांची पदे भरण्यात आली. या कालावधीत कंत्राटी वाहनचालकांना एकत्रित ३ हजार ५५० याप्रमाणे मानधन अदा करण्यात आले. परंतु चंद्रपूर जि. प. अंतर्गत कंत्राटी वाहनचालकाचे मानधन १ जून २०१२ पासून ७ हजार १०० करण्यात आले. या संदर्भात गडचिरोली जि. प. आरोग्य विभागाच्या कंत्राटी वाहनचालकांनी वारंवार निवेदन सादर केल्यानंतर १ जुलै २०१४ पासून मानधनात वाढ करून ७ हजार १०० इतके करण्यात आले. आरोग्य सेवा संचालनालयाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार बाह्य यंत्रणेद्वारे कामे करून घेताना जर ती कामे नियमितपणे पदनिर्मिती करून केली असता, जितका खर्च आला त्या खर्चाच्या कमीत कमी १० ते २५ टक्के इतकी बचत होईल, अशा रितीने खर्च करण्यात याव्या, अशा सूचना असताना देखील २०१४ ला नियमित वाहनचालकावर होणार एकत्रित खर्च एकूण वेतनाच्या १८ हजार ५८३ इतका अपेक्षित आहे. यानुसार कंत्राटी वाहनचालकांना १३ हजार ९३७ रूपये वेतन १३ मार्च २०१४ नंतर मिळणे अपेक्षित होते. परंतु ७ हजार १०० इतकेच मानधन कर्मचाऱ्यांना मिळत आहे. हे मानधन नियमित वाहनचालकाच्या तुलनेत ३८ टक्के एवढेच आहे. या तुटपुंज्या वेतनावर कुटुंबाचा गाडा चालविणे कठिण असल्याने कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना मानसिक, आर्थिक व कौटुंबिक त्रास सहन करावा लागत आहे. शासनाने दखल घेऊन वेतनातील तफावत दूर करून सुधारित मानधन अदा करावे, अशी मागणी कंत्राटी वाहनचालकांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)